विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसईतील कळंब, भुईगाव समुद्रकिनाऱ्यांवर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पर्यटकांना बंदी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामस्थांनी ही दक्षता घेतली आहे.
पर्यटकांनी किनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने कळंबपाठोपाठ भुईगावचा किनाराही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. कळंबच्या किनाऱ्यावर बंदी घातल्यानंतर पर्यटकांनी भुईगाव किनाऱ्याकडे धाव घेतल्याने आता हाही किनारा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबई आणि तालुक्यातील हजारो पर्यटक सुटीच्या दिवशी येत असतात. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ही गर्दी पुन्हा ओसंडू लागली होती. छटपूजेच्या निमित्तानेही या किनाऱ्यावर हजारो भाविकांची गर्दी होणार होती. मात्र, शासनानेच बंदी घातल्यामुळे दोन दिवस सर्व किनारे बंद ठेवण्यात आले होते. हीच संधी साधून कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास स्थानिक ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. कळंब किनाऱ्यावर बंदी घातल्यामुळे पर्यटकांनी भुईगावच्या किनाऱ्याकडे आपला मोर्चा वळवला होता. शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.
दरम्यान, विरार-ग्लोबल सिटीला लागून असलेले म्हारंबळपाडा हे गाव निसर्गसंपन्न आहे. शहराला लागून असले तरी अद्याप गावपण टिकून असल्याने अनेक लोक या ठिकाणी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी येत असतात. शिवाय, या गावाला लागूनच खाडी असल्याने अनेक जण या ठिकाणी निवांतपणा व्यतीत करतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून स्वच्छताकर म्हणून १० रुपये कर आकारला जातो. शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर शहरातील बगिचे, मैदाने, किनारे या ठिकाणी हळूहळू सूट देण्यात आली होती. त्यामुुुळे म्हारंबळ इथेही पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. मात्र, विरार ग्लोबल सिटी आणि परिसरातील नागरिक म्हारंबळपाडा येथे जाण्यास पसंती देत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थ कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.