कल्याण : प्रभारी सचिवपद कायमस्वरूपी भरा, अशी मागणी जोर धरत असताना दुसरीकडे उपसचिवपद नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. परंतु, त्याकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये उपसचिवपदासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती विभागातील लिपिक किशोर शेळके यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने ते या पदासाठी पात्र ठरले. परंतु, सात महिने उलटूनही शेळके यांची नियुक्ती करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.२००७ पासून पालिकेतील सचिव आणि उपसचिवपदे रिक्त आहेत. प्रशासन व पदाधिकारी यांनी सोयीनुसार सचिवपद प्रभारी ठेवले असताना हे उपसचिवपदही रिक्तच राहणार का, अशी शंका उपस्थित होत होती. २०११ मध्ये उपसचिवपदासाठी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. परंतु, पुढे त्यांचे काय झाले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रशासनाने उपसचिवपद भरण्याबाबत कार्यवाही सुरू केली.सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी १८ डिसेंबरला लेखी परीक्षा घेतली. या पदासाठी १७ उमेदवारांचे अर्ज आले होते. मात्र, १४ उमेदवारांनी परीक्षा दिली. यात २०० गुणांच्या लेखी परीक्षेत शेळके यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. शेळके यांची पालिकेत २१ वर्षे सेवा झाली आहे. दरम्यान, परीक्षा उत्तीर्ण होऊनही अद्याप त्यांना साधे नियुक्तीपत्रकही दिलेले नाही. सचिवपदी संजय जाधव यांची प्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे. उद्यान अधीक्षकपदाचा पदभारही त्यांच्याकडे आहे. सचिवपदी कायमस्वरूपी नेमणूक करण्यात टाळाटाळ केली जात असताना आता उपसचिवपदाच्या नियुक्तीचाही घोळ प्रशासनाकडून घातला जात आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागात माहिती घेतली असता शेळके हे परीक्षा उत्तीर्ण झाले असले तरी त्यांच्या नियुक्तीपत्रावर आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नसल्याचेसांगण्यात आले. लवकरच याबाबतची कार्यवाही केली जाईल आणि संबंधित प्रस्ताव महासभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.महासभेचा निर्णय महत्त्वाचाआयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर उपसचिवपद नियुक्तीचा प्रस्ताव महासभेत ठेवला जाणार आहे. त्यामुळे महासभेचा निर्णय महत्त्वाचा आहे.सचिवपद नियुक्तीचा यापूर्वी घातलेला घोळ पाहता महासभेची भूमिका विशेष ठरणार आहे. महापालिकेचे पहिले सचिव चंद्रकांत माने यांच्या निवृत्तीनंतर सचिवपदासाठी घेतलेल्या परीक्षेत सर्वाधिक गुण पालिकेचे अधिकारी अनिल लाड यांना मिळाले होते. परंतु, तत्कालीन महासभेने दुसरा क्रमांक पटकावलेल्या उमेदवाराला पसंती दिली होती. या वादग्रस्त निर्णयामुळे अद्याप सचिवपद कायमस्वरूपी भरलेले नाही.मागचा हा अनुभव पाहता उपसचिवपदासाठी पात्र ठरलेल्या शेळके यांना हिरवा कंदील दाखवला जातो की, येथेही वाद घातला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेला उपसचिवपदाचे वावडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:41 AM