शशिकांत ठाकूर
कासा : कासा जवळील कल्पेश पाटील या तरुणाने आधुनिक शेतीतून झेंडूच्या फुलांची लागवड करून मोठा विकास केला आहे. या व्यवसायात त्याला वर्षाकाठी १८ ते २० लाखाचे उत्पन्न मिळते.
आंबेदा गावातील कल्पेश दतू पाटील या कुणबी समाजातील तरुणाने नोकरी व्यवसाय कडे न वळता पारंपारिक पध्दतीची शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली. त्याने फुलांची मागणी लक्षात घेऊन फुल शेती केली. सुरुवातीला त्याने आपल्या वडिलोपार्जित 3 एकर जमिनीत झेंडूची लागवड केली. या व्यवसायात त्यांना चांगले उत्पन्न मिळाले हे लक्षात घेऊन त्याने फुलशेती व्यवसाय वाढविण्याचा निश्चय केला. व त्यांनी कासा, वाघाडी,बर्हाणपूर, आंबेदा, धामटने, चिंचपाडा, धरमपूर, भवाडी आशा आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी भाडे तत्वावर घेऊन ६0 एकर जमिनीवर झेंडूची लागवड केली आहे. या मध्ये कलकत्ता आॅरेंज, येल्लो, गोल्ड स्पॉट टू, आरोगोल्ड, अप्सरा, येल्लो अश्वगंधा या जातीच्या रोपांची लागवड करतात.
मागणी लक्षात घेऊन झेंडूच्या रोपांची लागवड आॅगस्ट ते जानेवारी महिन्यात चार ते पाच टप्प्यात आपल्याकडे भाड्याने घेतलेल्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये कल्पेश करत असून मे महिन्यापर्यंत हा सिझन चालतो. ही झेंडूची फुले दादर, कल्याण, पनवेल या सारख्या मोठ्या बाजारपेठे बरोबरच वापी, सुरत, बडोदा अशी मागणी असेल त्या बाजार पेठेत पाठवली जातात
गेल्या १० वर्षापासून कल्पेश हे फुल शेती करत असून. या व्यवसाय मध्ये त्याचे वडील व दोन भाऊ पुंडलिक आणि विजय त्यांना मदत करतात व मागील वर्षी कल्पेश यांनी 60 एकर जमिनीवर झेंडूची फुल शेती केली असून या मध्ये त्यांना 350 टन फुलांचे उत्पादन मिळाले व साधारण 30 ते 50 रु किलो भावाने विक्रीतून 60 लाखांची उलाढाल झाली असून 18 ते 20 लाखांचे उत्पन्न मिळाले. ही त्याची फुल शेती येथील तरु णांना प्रेरणादायी ठरत आहे.
दरम्यान याची दखल घेऊन नुकताच कोकण परिषद तर्फे त्यांचा दादर येथे शिक्षण मंत्री आशिष शेलार रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला
झेंडूच्या रोपांची 50 ते 60 दिवसांनी वाढ होऊन फुले येतात व फुले तीन महिने चालतात त्यामुळे कमी कालावधी जास्त उत्पन्न मिळत असून झेंडूला औषध व खत, पाणीही कमी लागते तसेच त्यांच्या उग्रवासामुळे गुर ढोर खात नाहीत. तसेच वर्ष भर मागणी असते.त्यामुळे झेंडूची फुल शेती फायदेशीर ठरते - कल्पेश पाटील, शेतकरी, आंबेदा