लोकमत न्यूज नेटवर्कवसई : बुधवारच्या लोकमतमध्ये कामण-बापाणे रस्त्यासाठी ग्रामस्थ रास्ता-रोको करणार असे वृत्त झळकताच महापालिकेला जाग आली असून या रस्त्याचा फिजिकल सर्वे करण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आल्याने बुधवारचा रास्ता रोको स्थगित करण्यात आला.कामण-बापाणे हा शॉर्टकट रस्ता सुरु झाल्यानंतर कामण ते वसई आणि कामण ते मुंबई अंतर कमी होणार आहे. त्याचा फायदा जुचंद्रसह वसईतील हजारो लोकांना होणार आहे. मात्र, भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याने रस्त्याचे काम गेल्या १९ वर्षांपासून रखडले आहे. हा रस्ता डीपी रोड असून त्याचा निधीही १९ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.पण, भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी घातलेला गोंधळ आणि प्रचंड प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे हा रस्ता रखडून पडला आहे, अशी माहिती कामण-बापाणे रस्ता कृती समितीचे अध्यक्ष केदारनाथ म्हात्रे यांनी दिली.हा रस्ता अत्यंत गरजेचा असल्याने वसई विरारमहापालिकेने आता तो करावा अशी मागणी सर्वपक्षीय कामण-बापाणे रस्ता कृती समितीने केली आहे. त्यासाठी बुधवारी हायवे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्ते आणि महापालिकेत समेट घडवून आणला. महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त घोन्सालवीस यांनी पोलीस स्टेशनमध्ये कृती समितीच्या शिष्टमंडळाला रस्ता करण्याची लेखी हमी दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले. महापालिकेने रस्त्याचे सर्वक्षण करण्याचे काम राणे मॅनेजमेंट कन्सलटंट या कंपनीला दिले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर महापालिका कामाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात करणार आहे.
कामण-बापाणे रस्ता महापालिका करणार
By admin | Published: June 29, 2017 2:42 AM