वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना होऊन ५ वर्षे उलटल्यानंतरही प्रशासनाला पार्किंग व हॉकर्स झोन निर्माण करता आले नाहीत. त्यामुळे वसईत वाहतूककोंडी व फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांवर प्रशासन कारवाई करीत आहे. परंतु, वाहने पार्क करण्यासाठी आवश्यक असलेले वाहनतळ मात्र निर्माण करण्यात प्रशासन उदासीन असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे. वसई-विरार परिसरात महानगरपालिकेचे आगमन झाल्यानंतर करदात्यांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध होतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने महानगरपालिका हद्दीत वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. पालिकेच्या निर्मितीनंतर सर्वसाधारणपणे २ ते ३ वर्षांत वाहनतळ व फेरीवाला विभाग निर्माण होईल, असा अंदाज होता. पण, गेल्या ५ वर्षांत त्यादृष्टीने कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागात वाहतूककोंडी व अडथळे यांना तोंड देत नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. मध्यंतरीच्या काळात फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व्हे करण्यात आला होता. परंतु, त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. वाहनतळाच्या बाबतीतही अशीच स्थिती राहिल्यामुळे अनेक रस्त्यांवर वेड्यावाकड्या पद्धतीने वाहने उभी करण्यात येत असतात. सध्या या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईस लोकांचा विरोध नाही, परंतु महानगरपालिकेने पार्किंग झोन तरी निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पार्किंगअभावी वसई-विरारमध्ये कोंडी
By admin | Published: July 25, 2015 4:03 AM