वाडा : आपटी गावातील सहा जलस्वराज्य कमिटी सदस्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मात्र, हे गुन्हे खोटे असून ते कुठलीही शहानिशा न करता दाखल केल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी वाडा पोलीस ठाण्यासमोर तब्बल १७ तास ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला.तालुक्यातील आपटी गावात जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना सुरू आहे मात्र या गावात गेल्या काही दिवसांपासून गावातील कातकरी वाडीत पाणी मिळत नाही म्हणून पाणीप्रश्न गंभीर झाला होता. या संदर्भात सोमवारी सायंकाळी वाडा पोलीस ठाण्यात जलस्वराज्य कमिटीला पोलिसांनी चर्चेसाठी बोलावले असता या कमिटीतील स्वप्नील पाटील, रमेश पाटील, पंकज मराडे, प्रल्हाद पाटील, हेमचंद्र पाटील व रवींद्र पाटील या सहा ग्रामस्थांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.ही घटना आपटी गावात वाऱ्यासारखी पसरली व शेकडो ग्रामस्थ वाडा पोलीस ठाण्यात दाखल होत या खोट्या गुन्हाचा जाब विचारला. कमिटी सदस्यांवर दाखल केलेले गुन्हे घाईने नोंदविण्यात आले असून कुठलीही शहानिशा न करता ते नोंदविले आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला व याविरोधात वाडा पोलीस ठाण्या समोर ग्रामस्थांनी तब्बल १७ तास ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदविला. न्यायालयीन लढतीत सहकार्य करण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आमदार शांताराम मोरे, नगराध्यक्ष गितांजली कोळेकर, उपनगराध्यक्ष उर्मिला पाटील, विक्र मगडचे नगराध्यक्ष रविंद्र खुताडे, नगरसेविका सुचिता पाटील यांनी ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन गुन्ह्याची माहिती जाणून घेतली.
खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आपटी ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 2:55 AM