पालघर - वाढवणं बंदर उभारणी साठी केंद्र आणि राज्य सरकार आग्रही होत चालल्याने किनारपट्टीवरील विरोध आता वाढू लागला असून बोर्डी ते मुंबई दरम्यान च्या गावातील आंदोलनकर्त्यानी आज आक्रमक भूमिका घेतली.ह्या आंदोलनात मोठा सहभागी झालेल्या महिलांनी '' काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसे काटेंगे' अशी भूमिका घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपले इरादे स्पष्ट केले. वाढवणं बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सर्व मच्छिमार संघटना, आदिवासी संघटना,सेवाभावी संघटना,स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २ऑक्टोबर रोजी आयोजित वाढवणं बंदरविरोधी हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. किनारपट्टीवरील मुंबई, पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आदी कोकणातील जिल्ह्यात ह्या बंद चे जोरदार पडसाद उमटले.पालघर जिल्ह्यातील सातपाटी,वाढवणं, बोर्डी, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू, चिंचणी, तारापूर, घिवली, उच्छेळी, दांडी, नवापूर, नांदगाव, मुरबे,वडराई,केळवे,एडवन,अर्नाळा, ते थेट मुंबई माहीम कुलाबा,कफपरेड,भाऊचा धक्का आदी भागात मोठा प्रतिसाद मिळाला.सातपाटी मधील सुमारे ७ ते ८हजार ग्रामस्थांनी गावातून रॅली काढून समुद्रावर एकत्र येत वाढवण बंदराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.ह्यावेळी कुलाबा भाऊ धक्का,क्रॉफर्ड मार्केट,सह मुंबई,पालघर,आदी भागातील मासळी मार्केट बंद ठेवण्यात आली होती. सध्या पालघर जिल्ह्यात निवडणुका असल्याने केंद्र व राज्य सरकारने निवडणुकी दरम्यान दबावाचे तंत्र उपजले असल्याने हाच दबाव निवडणूका संपल्यावर वाढवण बंदराच्या विरोधात काम करणाऱ्यां संघटना,लोकांवर लादला जाऊ शकत असल्याने हा दबाव उलथून टाकण्यासाठी महिला व तरुण वर्ग आज आक्रमक झाला होता.मच्छीमार,शेतकरी,डायमेकर, बागायतदार ह्यांना उध्वस्त करणारे हे बंदर कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही ह्या इर्षेने लोक पेटून उठले असुन कुठल्याही पद्धतीच्या दबावाला न जुमानता हे बंदर पुन्हा एकदा रद्द करण्याच्या इर्षेने पेटून उठला आहे. स्थानिकांच्या ह्या आंदोलनाला बळ देण्यासाठी कुलाबा,कफपरेड, माहीम,वेसावे, आदी भागातील हजारो लोकानी आपल्या भागात मासेविक्री बंद ठेवली. ह्यावेळी १७ नोव्हेंबर मुंबई आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. देशाला अणु ऊर्जेत सक्षम बनावे म्हणून पोफरण,अक्करपट्टी आदी भागातील शेकडो शेतकरी,मच्छीमारांनी आपली घरे,व्यवसायावर नांगर फिरवीत आपल्या जमिनी फारसा विरोध न करता शासनाच्या हवाली केल्या.मात्र त्याची केंद्र व राज्य सरकारने फसवणूक करीत त्यांना मिळणाऱ्या सोईसुविधा,नोकऱ्यापासून वंचित ठेवल्याने तेथील लोकांना सरकार च्या विरोधात न्यायलयात जावे लागले आहे.त्यामुळे यापुढे शासनाच्या कुठल्याही आश्वासनांवर विश्वास ठेवायला स्थानिक लोक तयार नाहीत. मच्छीमारांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करणाऱ्या ह्या सरकार विरोधात स्थानिकांचा आक्रोश वाढत असून लोकप्रतिनिधींवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.कारण ह्याच लोकप्रतिनिधी,नेते ह्यांनी वाढवण व परिसरात मोठ्या जमिनी खरेदी केल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले असून अनेक लोकप्रतिनिधी च्या विरोधात लोकांच्या मनात असंतोष खदखदताना त्यांच्यातील चर्चेतून दिसत आहे.
'काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसे काटेंगे', मच्छीमार संघटनेचं आक्रमक आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 1:51 PM