- सचिन लुंगसेमुंबई : गेल्या पन्नास वर्षांत खादीचा चेहरामोहरा बदलला आहे. खादीचा ग्राहक बदलला आहे. युवापिढी खादीकडे आकर्षित होत आहे. महाविद्यालयीन तरुणाई खादी परिधान करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खादीमध्येही वेळ आणि काळानुसार बदल होत आहेत. खादी परिधान करणे ही आजची फॅशन झाली आहे. युवापिढीमध्ये खादीची क्रेझ आहे. ‘डेनिम खादी’ने तरुणाईला भुरळ घातली असून, २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी करण्यात येत असतानाच, ज्या खादीचा बापूंनी आयुष्यभर प्रचार आणि प्रसार केला, त्याच खादीचा या निमित्ताने घेतलेला हा खास आढावा ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.बोरीवलीच्या कोरा केंद्रात खादीपासून तयार होत असलेल्या विविध वस्त्रांना देशासह विदेशातून प्रचंड मागणी असून, फोर्ट येथील खादी ग्रामोद्योग भवनासह खादी ग्रामोद्योग भंडारद्वारे ही वस्त्रे मागणीनुसार पुरविली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, खादीच्या कापडापासून तयार करण्यात आलेली वस्त्रे वापरण्याचे प्रमाण गेल्या ३ वर्षांत २० टक्क्यांनी वाढले असून, खादीच्या कापडापासून तयार करण्यात आलेली वस्त्रे वापरण्यात युवापिढी अग्रस्थानी आहे. युवापिढीमध्ये महाविद्यालयीन तरुणाईसह कार्यालयीन तरुणाईचा समावेश आहे, शिवाय खादीपासून तयार केलेली वस्त्रे वापरण्यात महिला वर्गही पुढे आहे.केंद्र सरकारच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशनच्या नियंत्रणाखाली मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री असोसिएशन कार्यरत आहे. असोसिएशन अंतर्गत खादी ग्रामोद्योग भवन, कोरा केंद्र आणि खादी ग्रामोद्योग भंडार कार्यरत आहे. फोर्ट येथे खादी ग्रामोद्योग भवनचे कार्यालय असून, ठिकठिकाणी खादी ग्रामोद्योग भंडार आहेत, तर बोरीवली येथे कोरा केंद्र आहे. भवन आणि भंडारमध्ये खादीची विक्री केली जाते. केंद्र सरकारच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशनच्या परवानाधारक संस्थांना शेतकरी वर्गाकडून कापूस पुरविला जातो. या परवानाधारक संस्थेचे सदर शेतकरी सदस्य असतात.या संस्थांकडून कापड उद्योगांना कापड तयार करण्यासाठी कापूस पुरविला जातो. कापड उद्योगांकडून त्यानंतर कापसापासून दोरे आणि मग खादीचे कापड तयार होते. बोरीवली येथील कोरा केंद्रात हे कापड दाखल होते. कोरा केंद्रात दाखल झालेल्या खादीच्या कापडावर प्रथमत: प्रक्रिया केली जाते. ब्लिचिंग, डायिंग, प्रिटिंग आणि टिचिंग या टप्प्यांद्वारे खादीच्या कापडावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, खादीच्या कापडाद्वारे तयार करण्यात आलेले सदरे, शर्ट, साड्या आणि पिशव्यांसारखे साहित्य खादी ग्रामोद्योग भवन आणि विविध भंडारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते.
महात्मा गांधी यांनी केले उदघाटन१९४६ साली महात्मा गांधी यांनी काळबादेवी येथील खादी ग्रामोद्योग भवनाच्या खादी ग्रामोद्योग भंडाराचे उद्घाटन केले होते. मुंबईमधील हे सर्वात पहिले भंडार होय. त्यानंतर खादी ग्रामोद्योग भवन आणि इतर भंडारासह कोरा केंद्र उभे राहिले.शरीरास फायदेशीर : खादीपासून तयार करण्यात आलेल्या विविध साहित्याचे फोर्ट येथील खादी ग्रामोद्योग भवनातून विविध स्तरांवर वितरण केले जाते. देश आणि विदेशातही मागणीनुसार खादीच्या कापडापासून तयार करण्यात आलेल्या वस्त्रांचा पुरवठा केला जातो. खादीचे कापड शरीरासाठीही चांगले असून, शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. - महेश मांजरेकर, व्यवस्थापक, मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री असोसिएशन.१९४६ साली स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. तेव्हा विदेशी मालावर बहिष्कार घातला गेला होता. याच काळात मुंबईत स्थापन झालेल्या ग्रामोद्योग भंडारचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले होते.- व्ही.जी. जाधव, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री असोसिएशन.