मनोर : कंचाड वनाधिकारी परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भोपोलीच्या जंगलातून रात्री खैरतस्करांनी तीन झाडांची कत्तल करून सर्व लाकडे लंपास केली. मात्र, रात्री राखण करणारे वन कर्मचारी व सुरक्षारक्षक गार झोपेत होते का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. उपवन संरक्षक जव्हारअंतर्गत येणारे कंचाड वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यक्षेत्रातील भोपोली गावाच्या हद्दीत वनविभागाच्या जंगलातून रात्री उशिरा खैरतस्करांनी तीन झाडांची कत्तल करून सर्व लाकडे चाेरून नेली. आतापर्यंत कंचाड वनविभागांतर्गत येणारे अंभई, म्हसरोली, नवी दापचरी, घाणेघर, बंगरचोळाच्या जंगलातून शेकडो झाडांची कत्तल झाली आहे. लाखो रुपयांची लाकडे लंपास करण्यात आली असून, अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेली नाही. याबाबत प्रतिक्रियेसाठी वन परिक्षेत्र अधिकारी जे. आर. तायडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फाेन बंद असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
भाेपाेलीच्या जंगलात रात्री होते खैरांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 3:41 AM