मनोर : चाहाडे वनपाल क्षेत्र अंतर्गत कोकनेर गावाच्या हद्दीतील जंगलातून खैर झाडांची अवैध कत्तल करून लाकडे लंपास करण्याचा प्रयत्न स्थानिक आदिवासीच्या सतर्कतेमुळे हुकला. वनकर्मचाऱ्यांनी तो माल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.कोकनेर गावाच्या हद्दीतील जंगलातून खैराची तीन भली मोठी झाडे कापून ते गाड्यांमध्ये भरून पळविण्याच्या तयारीत असताना तेथील वन कर्मचाऱ्यांना खबर मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन कत्तल केलेल्या झाडांची पहाणी तसेच पंचनामा केला. आणि ही लाकडे नेटाली डेपोवर जमा केली. मात्र प्रत्यक्ष जंगलात जाऊन पहाणी केली असता तीन झाडांची कत्तल करण्यात आल्याचे दिसले. डेपोत जमा केलेले लाकडांची पाहाणी केली त्यामध्ये तफावत दिसते आहे. वास्तविक २.३४६ घनमीटर एकूण २९ नग त्याची किंमत २९,८११ रुपये असून ते नेटाली डेपोमध्ये ठेवले आहेत.परंतु प्रत्यक्षात लाकूड जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी वनक्षेत्रपाल पालघर येथे गुन्हा दाखल केला असून उमेश आणि राजाराम यांना अटक केली आहे. तर बाकी आरोपींचा शोध सुरू आहे. वनपाल एम.राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ८० टक्के माल जमा केला आहे. झाडांचे फांद्या आणि कमी जाडीचे लाकूड तिथेच टाकले. ते डेपोवर आणलेले नाही.
कोकनेरच्या जंगलात खैराची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:54 PM