तलासरी : अपहरणाचा बनाव करत मुलानेच मित्राच्या सहाय्याने बापाकडे मागितले ५० लाख रुपयाची खंडणी परंतु पोलिसांनी अपहरणाचा बनाव करणाºया मुलासह त्याच्या मित्राला अवघ्या पाच तासात छडा लावत दोघांना ताब्यात घेतले.२२ तारखेच्या रात्री भूमिक दिनेश प्रजापती या १७ वर्षांच्या मुलाचे अंधेरी येथून अपहरण झाल्याचा फोन आला असून अपहरणकर्ते ५० लाखांची मागणी करीत आहेत अशी माहिती येथील कापड व्यापारी दिनेश प्रजापती यांनी पोलिसांना दिली. त्यांनी पोलिसांचा तीन टीम तयार करून अपहरणकर्ता मुलाच्या पित्याला सांगत असलेल्या गोष्टी फॉलो करण्यास सांगितले.मुलाला जिवंत पहायचे असेल तर कुणाला ही माहिती न देता ५० लाख देण्याची मागणी अपहरणकर्ता फोनवर करीत होता, त्यामुळे मुलाला सुखरुप कुटुंबाच्या स्वाधीन करण्याबरोबरच अपहरणकर्त्यालाही पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पालघर, तलासरी पोलिसांच्या टीमने वडिलांना आलेल्या फोनप्रमाणे रिकामी बॅग सोबत घेण्यास सांगितले. अपहरणकर्त्याने सांगितल्याप्रमाणे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बोईसर त्यांनतर चिल्लेरफाटा, सिमला हॉटेल, मनोरपर्यंत मुलाचे वडील दिनेश प्रजापती यांच्या गाडीच्या मागे पोलिसांनी सापळा लावला. मात्र अपहरणकर्ता फोनवरून सारखे खंडणी घ्यायला येण्याचे ठिकाण बदलत होता. अखेर त्याने मनोर येथे पैसे ठेवण्यास सांगितले.त्याप्रमाणे रिकामी बॅग पेट्रोलपंपा जवळील निर्जनस्थळी ठेवली आणि पोलिसांनी त्याला ती बॅग घेण्यासाठी येण्याची संधी दिली. अपहरणकर्ता आला खरा मात्र खाली बॅग पाहून तो पुन्हा जवळच असलेल्या लक्ष्मी लॉजकडे निघून गेला. पोलिसांनी लॉजला बाहेरून घेराव घालून एका रूममधून अपहरण झालेला भूमिक प्रजापती आणि त्याचा तथाकथीत अपहरणकर्ता असीम इकबाल शेख याला ताब्यात घेत सुटकेचा निश्वास सोडला.मात्र पोलिसांना पाहताच अपहरणकर्ता असीम शेख याने भूमिक प्रजापतीनेच अपहरणाचा कट रचला असून त्याच्या सांगण्यावरूनच ५० लाखाची मागणी करणारा फोन केल्याचे कबूल केले आणि अपहरणाचा बनाव उघड झाला. भूमिक प्रजापती हा उंबरगाव येथे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत होता मात्र शिक्षणासाठी काही महिन्यांपूर्वीच त्याला अंधेरी येथील नातेवाईकांकडे पाठविण्यात आले होते, मौजमजा, किंमती मोबाईल, इत्यादीसाठी तलासरीमधील मित्र असीम शेख याच्या मदतीने अपहरणाचा बनाव करण्याचा कट स्वत:च भूमिकने रचला असल्याचं समोर आले.२२ सप्टेंबर रोजी अंधेरी येथे अपहरणाचा गुन्हा ५३१/१७, ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे दोघांना अंधेरी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास अंधेरी पोलिस आणि तलासरी पोलिस निरीक्षक केशवराव नाईक करीत आहेत .या उनाड कार्ट्यांकडे पैसा येतो कुठून?शालेय जीवनात मित्रांसोबत लागलेल्या मौजमजेच्या हौशी आणि किमती मोबाईल, गाडी, इत्यादी साठी अनेक जण कमी वेळात पैसे मिळविण्यासाठी वाईट मार्गाच्या आहारी जातात आणि त्यातून घडतो तो गुन्हा असाच एक गुन्हा तलासरी पोलीसांनी अवघ्या ५ तासात उघड करीत अपहरणाचा बनाव समोर आणला. तलासरीत सध्या काही उनाड मुले कोणताही कामधंदा करता नसतांना लाखो रुपयाच्या मोटार सायकली व गाड्या उडवीत आहेत, पैसे उधळीत आहेत. यांच्याकडे एवढा पैसे येतो कुठून याची माहिती पोलिसांनी घ्यावयास पाहिजे अन्यथा ही पिढी वाममार्गाला लागेल.
अपहरणाचा बनाव : मुलाने बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:26 PM