वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शीतपेये बनविणारी कंपनी असून या कंपनीने येथील शेतकरी नागेश जाधव यांच्या गट नंबर २८९ मधील एक एकर जमिनीवर अतिक्र मण केले असून वारंवार सांगूनही हे अतिक्र मण दूर केलेले नाही. तसेच महसूल प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतापलेल्या शेतकºयाने आपल्या कुटुंबासह अतिक्रमण केलेल्या जागेवर १ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात नागेश जाधव म्हणतात, मी कुडूस गावाचा रहिवासी असून शेतकरी आहे. माझी कोकाकोला कंपनीजवळ गट नंबर २८९ ही जमीन असून या जमिनीतील एक एकर जागेवर कंपनीने अतिक्र मण केले आहे. या जमिनीवर भातशेती असताना तिचा वापर बिगर शेतीसाठी केला असल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. आमच्या जागेची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून हद्द सुध्दा कायम करून घेतल्याचे निवेदनात नमूद केले आहे. महसूल कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप निवेदनात जाधव यांनी केला आहे.यासंदर्भात कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.