वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा समजला जाणाऱ्या कुडूस कोंढला या रस्त्याच्या कामाची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपूनही त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. यामुळे प्रवासी चालक व नागरिकांची गैरसोय होत असल्याने ते संताप व्यक्त करीत आहेत. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे.
कुडूस कोंंढला खैरे अंबिवली या १४ किमी रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापूर्वी मंजूर झाले असून त्यासाठी १४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कुडुस ते कोंढला या दरम्यानचा रस्ता सिमेंट कॉंक्र ीटीकरण होणार असून उर्वरित रस्ता डांबराचा करण्यात आला आहे. या कामाचा ठेका जिजाऊ कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आला आहे. या कामाची मुदत डिसेंबरपर्यंत होती. मात्र ती संपूनही रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या रस्त्यावरील विद्युत खांब स्थलांतरित करण्याचे काम बाकी आहे.चार किमी अंतराच्या साईड पट्टीचे काम तसेच ४०० मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामामुळे वाहन चालक, प्रवासी व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.रस्त्याच्या कामाची मुदत जरी संपली असली तरी येत्या पंधरा दिवसात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात येतील. अरविंद कापडणीस- सहाय्यक अभियंता वाडा