पारोळ : कोरोनाच्या संकटाने अवघे राज्य ग्रासले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता परप्रांतीय नागरिकांबरोबरच कोकणचा चाकरमानीदेखील मिळेल त्या वाहनाने गावाकडे रवाना होत असल्याचे चित्र मध्यंतरी दिसत होते. मात्र, गावाकडे जाताना मोजावे लागणारे दामदुप्पट भाडे, गावाकडील घरी जाण्याआधी तेथील शासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होणे, यासारख्या नियमांमुळे कोकणवासी गावाकडे परतण्याऐवजी वसईतीलच घरी राहणे सध्या पसंत करत असल्याचे चित्र आहे.
वसई - विरारमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत कामधंद्यानिमित्त कोकणातील रहिवासी मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इतर वेळेस गुण्यागोविंदाने राहणारे हे नागरिक मध्यंतरी कोरोनाच्या भीतीने मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतले आहेत. विरार पूर्वेतील कारगीलनगरमधील परिसरात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील रहिवासी मोठ्या संख्येने राहतात. वाढता उन्हाळा, पाणीटंचाई, लॉकडाउन आणि त्यात अन्नधान्यावाचून हे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातूनच मध्यंतरीच्या काळात अनेक जण कोकणात परतले. पण, आता हा ओघ मंदावलेला दिसतो.
गावी जायचे असेल तर खासगी वाहनचालकाला जादा भाडे द्यावे लागते. प्रतिमाणूस १००० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच गावी गेल्यानंतर थेट घरात प्रवेश मिळत नाही, तर १४ दिवस तेथील प्रशासनाने व्यवस्था केलेल्या वास्तूत क्वारंटाइन व्हावे लागते.