- सुनिल घरतपारोळ - नालासोपारा मतदारसंघातील मनवेल पाडा-कारगिलनगर या भागात कोकणी वोट बँक असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये या विधानसभा मतदार संघातून कोणता पक्ष आघाडी घेईल हे कोकणी मतदारांवर अवलंबून असणार आहे.मुंबईमध्ये राहणारा चाकरमानी गेल्या पंधरा वर्षांपासून वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे. साहजिकच या कोकणी मतांचा मोह कोणत्याही पक्षाला व्हावा. वसई-विरार शहरात बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापनेत प्रत्येक मोठ्या पक्षाला बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे समर्थन राहिले आहे. परिणामी वसईत या मित्रपक्षाला कोणीही बाधा पोहोचवली नव्हती. त्यामुळे बहुजन विकास आघाडीनेही एक-दोन मतपेढी सोडल्या तर सगळ्यांना गृहीतच धरले होते.मागील लोकसभा पोटनिवडणूक मात्र या सगळ्याला अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने आणि ही लढाई दोन्ही पक्षांसाठी अहंकाराची ठरल्याने बहुजन विकास आघाडीची आपल्याच घरात कोंडी झाली. अपेक्षेप्रमाणे राज्यात सत्ता असलेल्या भाजपने प्रतिष्ठेची करून ही, लोकसभा पोटनिवडणूक जिंकली. तेव्हापासूनच या भागात विशेष महत्त्व प्राप्त झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कोकणी मतांचे महत्त्व ओळखून बविआच्या वॉर्डात हळदी-कुंकू आणि कोकण मेळाव्यांचे आयोजन या वर्षी केले होते त्यातून बविआला शह देण्याचा प्रयत्न केला होता.मनवेलपाडा-कारगिलनगर हा भाग मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत याच भागातून बविआने मताधिक्क्यात आघाडी घेतली होती. तर महापालिका निवडणुकीत या भागाचे तब्बल पाच प्रभागांत विभाजन झाले होते. या पाचही प्रभागांतून बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक कोकणी माणसाच्या मतांवर निवडून आले होते. मागील पाच वर्षांत मनवेलपाडा-कारगिलनगर भागाची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे. हा संपूर्ण भाग कोकणबहुल लोकवस्तीचा आहे. २०१४ च्या निवडणुकीत या भागात २० हजारच्या आसपास नोंदणीकृत मतदार होते. या वेळी ही मतदार संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिच स्थिती वसईतील अन्य भागांतही आहे. त्यामुळेच या वार्डांवर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. या भागात असलेली कोकणबहुल लोकवस्ती भाजपचे मुख्य ‘टार्गेट’ असणार आहे.राजकारणातील तिढा : या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती व बहुजन विकास आघाडी या दोन लढत होण्याची शक्यता असून या भागात भाजपाने घेतलेल्या मेहनतीचा युतीला फायदा होईल का? तसेच, युतीच्या राजकारणातत नाराज असलेले राणे समर्थक शिवसेना उमेदवाराला मदत करतील का? हा ही युती समोर प्रश्न असून याचा फायदा बहुजन विकास आघाडी उचलेला का असाही प्रश्न आहे.
नालासोपारा विधानसभा सभेत कोकणी मतदारांचे प्राबल्य, बहुजन विकासच्या राजकारणाचे युतीपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:40 AM