वाडा : वाडा तालुक्यातील चंद्रपाडा येथील काशिनाथ पाटील यांनी आपल्या पाच एकर जागेत फुलांची लागवड केली आहे. मात्र, विजेचे यंत्र लावूनही अद्याप विजेची जोडणी न झाल्याने विद्युत पुरवठा नाही. परिणामी पाणी शेतापर्यंत आणता येत नाही. पाण्याअभावी ही फुलशेती करपू लागली आहे. महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकºयाला बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
पाटील यांनी आपल्या शेतावर विजेची जोडणी घेण्यासाठी ३ आॅगस्ट २०१७ रोजी महावितरण कंपनीकडे ५ हजार ४०० रुपये भरले होते. मात्र, अनेक वर्षांपासून हेलपाटे मारून त्यांच्या जागेवर खांब पुरून वीजवाहिनी देखील खेचली. त्यानंतर वीजेचे यंत्रही बसवले. मात्र काही महिन्यांपासून हेलपाटे मारूनही वीज जोडणी केलेली नाही. पाटील यांनी यंदा विविध जातीच्या फुलांची लागवड केली आहे. मात्र, वीजजोडणी नसल्याने आता पाण्याअभावी फुलशेती करपू लागली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना लाखो रूपयांचा फटका बसणार असल्याने ते चिंतेत आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहा. अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता ट्रान्सफॉर्मर तत्काळ सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.