नालासोपारा : उन्हाळा संपून पावसाळा जवळ आला तरी वसई-विरार शहरात शीतपेयांची तपासणी अद्याप झाली नसून मनपाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदाऱ्या झटकून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहेत. याप्रकरणी जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईबाबत शासनाने लेखी खुलासा मागवावा आणि यास जबाबदार असणाºया संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून महानगरपालिकेला शहरात शीतपेय तपासणी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी अशोक शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात दूषित शीतपेय बनवले जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. त्यापाठोपाठ असे अनेक प्रकार सोशल मीडियावरून उघडकीस येत आहे. वसई-विरार शहरात ठिकठिकाणी शीतपेय, थंड पदार्थ यांची विक्री होताना दिसत आहे. उन्हाळ्यात याला मागणी असल्यामुळे जागोजागी विक्रेते आपल्या हातगाड्या उभ्या करून याची विक्री करतांना दिसून येतात मात्र यासाठी वापरण्यात येणारे पाणी, बर्फ, रंग याची प्रशासनाकडून कोणतीही तपासणी होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही याबाबत चालढकल होते आहे. वसई-विरार शहरातील शीतपेयांच्या तपासणी करण्यासाठी लवकरच पथक नेमण्यात येणार असे आयुक्तांकडून सांगण्यात आले होते.
आरोग्य अधिकाºयांनी याकडे प्रभारी आयुक्त लक्ष देतील असे सांगण्यात आले होते. मुळात इच्छाशक्तीचा अभाव आणि जबाबदारीचे भान नसल्यामुळे प्रशासनाचे या सार्वजनिकदृष्ट्या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. - अशोक शेळके (आरोपकर्ते)