वसई : नालासोपारा रेल्वेस्थानक गैरसोयीसाठी कुप्रसिद्ध असून येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. रेल्वेपुलावरील अनधिकृत फेरीवाले, रेल्वे फलाटावरील अनधिकृत बाजार तसेच पूर्वेस रेल्वेच्या आवारातच भरणारा अनधिकृत भाजीपाला बाजार अशा विविध कारणांनी हे रेल्वेस्थानक सतत प्रकाशझोतात असते. मुसळधार वृष्टी झाली की या रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आवाराला तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होते.दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे नालासोपारा स्थानकाच्या पूर्वेस असलेल्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. येथे रेल्वेने अधिकृत रिक्षातळ निर्माण केला आहे परंतु या रिक्षातळावर येऊन रिक्षात बसणे धोकादायक झाले आहे. तर येथील अनधिकृत बाजारामुळे भाजीपाल्याचा कचरा टाकला जातो. एकिकडे दुर्गंधी तर दुसरीकडे गुडघाभर पाणी यातुन मार्ग काढताना रेल्वेप्रवाशांचा जीव अक्षरश: कासावीस होत असतो. भाजीपाल्याचा कचरा असल्यामुळे पाणी निचऱ्याचे मार्ग बंद होऊन पावसात हा संपूर्ण परिसर जलमय होतो. रेल्वेसुरक्षा बल व रेल्वे अधिकारी यांना मॅनेज करून हा बाजार भरवण्यात येत असल्याचे नागरिक सांगतात.
सोपारा स्टेशनचा झाला तलाव
By admin | Published: July 28, 2015 11:30 PM