वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशासह सर्वत्र गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसांच्या गणपतीबाप्पांसह अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनावेळी भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वसईत गणेश विसर्जनासाठी ‘तलाव आपल्या घरी’ ही एक अभिनव संकल्पना राबवण्यात येत असल्याची माहिती आ. हितेंद्र ठाकूर यांनी दिली.
कोरोना महामारीत गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांची गर्दी वाढू नये व मोजक्या भक्तांसहीत अधिक जण घराबाहेर पडू नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणीही गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदा वर्षी वसईत एकूण ७२ कृत्रिम फिरत्या तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. वसईत प्रत्येक प्रभागनिहाय ‘तलाव आपल्या घरी’ ही अभिनव अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्या गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्तींची नोंदणी स्थानिक माजी नगरसेवक, संबंधित बविआ कार्यकर्ते यांच्याकडे केली आहे, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याच हाऊसिंग सोसायटीत सर्व विधी करून गणेशाचे विसर्जन केले जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतर्फेही संपूर्ण शहरातील प्रत्येक भागात कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या तलावांशेजारी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उत्तम व्यवस्थापन केले जात आहे.