पालघर : माहिम ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतू पाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारत संकुल उभारताना नैसर्गिक नाले तसेच ओढे बंद केल्याने ९० ते ९५ आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी शिरून अन्नधान्य, विद्यार्थ्यांची पुस्तके, कपडे, भिजून मोठे नुकसान झाले आहे. नियम व कायदे पायदळी तुडवून भूमाफीयांची दादागिरी सुरू असून बिल्डरांच्या विरोधात तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांसह आदिवासी एकता परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बिल्डरांवर कारवाईची मागणी केली.पालघर शहरात गोठणपुर, वीरेंद्रनगर, डुंगीपाडा, घोलवीरा, चिंतूपाडा, माहिमरोड इ. भागात काही बिल्डरांनी नैसर्गिक नाले बंद करून अथवा लांबी कमी करून नैसर्गिक प्रवाह बदलल्याने या भागातील गरीबांच्या अनेक घरात ३ ते ४ फुट पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. यावेळी पालघर अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने ४० ते ४५ लोकांची सुखरूप सुटका केली होती. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावरील चिंतूपाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या एका बिल्डराने अनेक वर्षापूर्वीचा वहिवाटीचा रस्ता व तेथून वाहणारे नैसर्गिक नाले व ओढे बंद केल्याने पाण्याचा निचरा न होता अनेक घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते व पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक संकटावर मात करून लहान मुलांचे जीव वाचविण्यात लोकांना यश आले. लक्ष्मी कॉम्प्लेक्सला स्थानिकांचा विरोध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बिल्डरने आपले काम सुरूच ठेवले असून प्रशासन कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी एकता परिषदेचे गोपिनाथ चाकर, शकुंतला तांडेल, किर्ती वरठा, अमोल रावते यांनी कारवाईची मागणी केली. (वार्ताहर)
जिल्ह्यात भूमाफियांची दादागिरी
By admin | Published: July 28, 2015 11:33 PM