मंगेश कराळेनालासोपारा : नालासोपारा पूर्व आणि पश्चिम या दोन भागांना जोडणाºया एकमेव ओव्हर ब्रिजला १२ ते १५ मोठे खड्डे पडले आहेत. याकडे वसई - विरार महानगरपालिका तसेच अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या खड्ड्यांमुळे भविष्यात एखादा अपघात घडण्याची वाट प्रशासन पहात आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत.
नालासोपारा शहरात रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेने १९९९ मध्ये पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारा ओव्हर ब्रिज तयार करून तो खुला केला होता. हा एकमेव ब्रिज असून वाहतुकीसाठी तो अपुरा पडत असल्याने सकाळी संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी होते. अनेकदा तर हा ओव्हर ब्रिज पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याने नवीन ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महानगरपालिकेने पूर्व - पश्चिम विभाग जोडण्यासाठी दोन ओव्हर ब्रिजचा प्रस्ताव तयार करून हालचाली सुरू केल्या आहेत. पण प्रत्यक्षात हे कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नालासोपारा शहराची अंदाजे लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली असून सध्या हा एकमेव ओव्हर ब्रिज असल्याने लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या एकमेव ओव्हर ब्रिजची डागडुजी तसेच विशेष काळजी महानगरपालिकेने घेणे गरजेचे असतानाही या ब्रिजवर भले मोठे मोठे १२ ते १५ खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे काही मोटार सायकलस्वारांचे अपघात होऊन पडल्याने जखमी झाले असून त्यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीवरही परिणाम होतो. परिणामी वाहनांची रांग लागून वाहतूक कोंडी होते. या ओव्हर ब्रिजचे खड्डे लवकरात लवकर वसई विरार महानगरपालिकेने बुजवावे, अशी लोकांची मागणी आहे. या एकमेव ओव्हर ब्रिजचे वसई विरार महानगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे असल्याचेही ब्रिजच्या एकूण परिस्थितीवरून दिसून येत आहे.
या पुलावर खड्डे पडल्याची माहिती आता मिळाली असून लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात येतील. - राजेंद्र लाड, (कार्यकारी अभियंता, वसई विरार महानगरपालिका)
महानगरपालिकेला आमच्या जीवाचे आणि ओव्हर ब्रिजचे काही सोयरसूतक नाही. हा एकमेव पूल जर वाहतुकीसाठी बंद झाला तर लोकांना व वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. - मनोहर बंदरकर (स्थानिक रहिवाशी)