नालासोपारा : सातिवली गावदेवी मंदिर ते गोखिवरे या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत. यामुळे अनेकदा अपघात तसेच वाहतूककोंडी होत असते. आजारी रुग्णांना तसेच वाहन चालकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने हॉस्पिटलचा खर्च तसेच वाहन दुरुस्तीच्या खर्चासाठी पैसे जमा करणे सर्वसामान्यांना खूप अवघड झाले आहे.
दरम्यान, सातिवली गावदेवी मंदिर ते गोखिवरेपर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवून नागरिकांना व वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वसई-विरार शहर महानगपालिकेचे प्रभाग समिती जी (वालिव) चे सहायक आयुक्त सुरेंद्र पाटील यांच्याकडे अपंग जनशक्ती संस्थाचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.