भार्इंदर : मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी या पालिकेच्या रुग्णालयात बाळंतीणींना देण्यात आलेल्या नाश्त्यात अळ्या सापडल्याची घटना सोमवारी घडली. त्याची चौकशी केल्यानंतर आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने सुरू केल्याची माहिती विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी दिली.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील रुग्णालयासह भार्इंदर येथील भारतरत्न भीमसेन जोशी रुग्णालयातील बाळंतीणींना पोषक आहार मोफत पुरवला जातो. त्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची कार्यवाही महिला व बाल कल्याण समितीकडून केली जाते. त्याचे कंत्राट समितीने प्रज्वलीत ज्ञानदीप सामाजिक संस्थेला दिले आहे. या कंत्राटदाराकडून रूग्णांना सकाळ, संध्याकाळचा नाश्ता व दुपार, रात्रीचे जेवण दिले जाते.सोमवारी नेहमीप्रमाणे कंत्राटदाराने या बाळंतीणींना नाश्त्यामध्ये उपमा दिला. मात्र त्यात अळ्या असल्याचे दिशा हाडमोडे या महिला रुग्णाच्या निदर्शनास आले. तीने त्याची माहिती इतर रूग्णांना दिली असता त्यांच्या नाश्त्यातही जिवंत अळ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याची माहिती रुग्णालय कर्मचाºयांना देत रूग्णालय अधिक्षिका डॉ. मीनल पिंपळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यावर पिंपळे यांनी प्रभारी मुख्य आरोग्य अधिकाºयांना त्वरित पत्रव्यवहार करून यापूर्वी देखील रुग्णांनी निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याच्या तोंडी तक्रारी केल्याचे पत्रात नमूद केले. त्यामुळे या प्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी मुख्य आरोग्य अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली पथकाने मंगळवारी रुग्णालयात सकाळी ११.३० ते दुपारी १.३० दरम्यान देण्यात येणाºया आहाराबाबतची सखोल चौकशी केली. त्यात तथ्य आढळल्याने घटनास्थळी कंत्राट चालकालाही बोलावले. त्यावेळी कंत्राटदारावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्याला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही सुरु केली. असे प्रकार महिला व बालकल्याण समितीच्या अनियंत्रणामुळेच घडत असल्याचे स्पष्ट करत कंत्राटदाराला तत्पूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याकडून खुलासा मागवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत महिला व बालकल्याण समितीचे अधिकारी दामोदर संख्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्याच्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले जाणार असून नवीन कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रीया पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले.
पालिका रुग्णालयातील नाश्त्यात अळ्या; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:32 AM