पंकज राऊतबोईसर : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापले. सर्वच राजकीय पक्ष व आघाड्यांनी पालघर जिल्हा परिषदेवर तसेच पंचायत समित्यांवर आपली सत्ता आणण्यासाठी कंबर कसली असून माजी मुख्यमंत्र्यांसह विद्यमान दोन मंत्री व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनीही जिल्ह्यात प्रचारसभा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा, धावत्या बैठका, गाठीभेटींबरोबरच वाहनांवर लाउडस्पीकर लावून कर्कश आवाजात दिवसभर प्रचार सुरू होता.निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या क्षणापर्यंत जोरात सुरू होती. प्रत्येक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. काही गण व गटात अपक्ष उमेदवारांनी चिंता वाढवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत येण्याची आहे.दरम्यान, पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १७ तर पंचायत समितीच्या ३४ जागांवर निवडणूक होणार आहे. २०१५ साली पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ७, बहुजन विकास आघाडी ५, भाजप ३ तर अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक जागांवर विजय मिळवला होता.पालघर तालुक्याच्या पंचायत समितीवर शिवसेनेने सलग भगवा फडकावून पालघर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे दाखवून दिले होते. २०१५ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने १९, बहुजन विकास आघाडीने १० भाजप ४ व अपक्ष एक असे एकूण पक्षीय बलाबल होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पालघर पंचायत समितीची एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे ही निवडणूक सर्व पक्षांनी प्रतिष्ठेचीकेली आहे.>सर्वच पक्षांची अस्तित्वाची लढाईजिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागातील विकासाचे द्वार समजले जाते. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना-भाजप स्वतंत्र लढत असल्यामुळे दोन्ही पक्षांचे जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात किती राजकीय ताकद आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे, तर सर्वच पक्षांची अस्तित्वाची ही लढाई असणार आहे.
शेवटच्या टप्प्यात तापले राजकीय वातावरण, अनेक दिग्गजांची जिल्ह्यात हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 1:11 AM