लोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, वसई, नालासोपारा, विरार या शहरी भागांत दररोज ८००च्या घरात रुग्णसंख्या आढळत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील गावा-गावातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असतानाच, आता रुग्णांचे मृत्यूही होत असल्याने कोरोना चिंतेचा विषय बनला आहे. या कोरोना लाटेच्या प्रभावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, घरातील कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांतील आधार हरपला आहे. वसई ग्रामीण भागातील भालीवली गावातील हसत्या-खेळत्या पाटील कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाने हिरावून घेतल्याने आज हे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.कोरोनाचा कहर वसईच्या ग्रामीण भागात वाढतच असून, सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत भालीवलीस्थित एकाच कुटुंबातील वडील, आई व मुलगा अशा तिघांचा सहा दिवसांत अंत झाल्याने परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भालीवली गावातील पाटील कुटुंबातील रामचंद्र जगन्नाथ पाटील (वय ७२) यांचा १४ एप्रिल रोजी उपचार सुरू असताना अंत झाला. लगेचच दुसऱ्यादिवशी त्यांची पत्नी रेखा पाटील (६८) यांचाही मृत्यू झाला. या दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळलेल्या पाटील कुटुंबातील त्यांचा मुलगा गणेश रामचंद्र पाटील (३५) याचेही सहाव्यादिवशी उपचारादरम्यान निधन झाले. यामुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा सागर कोसळला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वसई ग्रामीण भागातसुद्धा कोरोना रुग्णांत मृत्यूचे प्रमाण वाढले असून, कोपर, हेदवडे, भालीवली, नवसई, भाताणे, आंबोडे, शिरवली, पारोळ, देपिवली, शिवणसई, तिल्हेर, चांदीप, भामटपाडा या गावांतील नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. या भागात नागरिकांमध्ये भीती पसरली असून, आता जनजागृतीची गरज आहे.बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची कसरततालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रोज वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांत रुग्णांना बेड मिळविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. त्यात ऑक्सिजनही अपुरा पडत आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर बेडसाठीही वाट पाहावी लागत असल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या लाटेत घरातील कर्ते पुरुष गमावल्याने हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:51 PM