लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : सहा वर्षांपूर्वी विभाजन झालेल्या तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढायला लागला आहे. मीरा - भाईंदर - वसई - विरार पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेत नाही. गोळीबार, पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यातील आत्महत्या, परदेशी नागरिकांचे वास्तव्य, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी यामुळे तुळिंज पोलीस ठाण्याचे नाव नेहमीच चर्चेत असते. त्यातच साेमवारी एका दिवसात झालेल्या दाेन हत्या आणि बुधवारी पतीने पत्नीची केलेली हत्या, यामुळे तुळिंज पाेलीस ठाण्याचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पाेलीस अपयशी ठरत असल्याचा आराेप नागरिक करत आहेत.
सुमारे सहा ते साडेसह लाखांची लोकसंख्या असलेल्या नालासोपारा पूर्वेत तुळिंज पोलीस ठाणे आहे. या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असल्याने पाेलीस ठाण्यातील मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे, तसेच साधनसामुग्रीची कमतरता आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तीन हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा पूर्वेत संख्येश्वर येथे ४५ वर्षीय सुरक्षारक्षकाची तीन आरोपींनी हत्या केली. याच तिघांनी रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लुटले. हत्येच्या आदल्या रात्री तुळिंज पोलिसांनी गस्त घातली असती तर या घटना झाल्या नसत्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मोबाइलसाठी एका २९ वर्षीय रिक्षाचालकाची गर्दुल्याने चाकूने हत्या केली आहे. तुळिंज हद्दीत गर्दुल्यांचे वाढते प्रमाण भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे. दोन महिन्यांत ५१ घरफोड्याचालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांत गुन्हेगारीच्या आकडेवारीनुसार तीन हत्या, ३२ जबरी चोरी, ५१ घरफोड्या, ३८ वाहनचोरी, ४७ दुखापत, ११ एनडीपीएस, ८ फसवणूक, १६ दारूबंदी, १३ अपहरणांच्या घटनांची नोंद झाली आहे.
तुळिंज पोलीस ठाण्यात २३ अधिकारी असून, १३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याच स्टाफच्या प्रत्येकाने इमानेइतबारे काम केले तर गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना नक्कीच यश मिळेल.- राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळिंज पाेलीस ठाणे