ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 25 - मुंबई अहमदाबाद हायवेवर वसई हद्दीत सातीवली येथे रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
वसई तुंगारेश्वर जंगलातून बाहेर पडलेला बिबट्या वसईतील सातावली ब्रीज येथून रस्ता ओलांडत असताना त्याला एका अज्ञात वाहनाने जोराची ठोकर दिली. यात बिबट्याच्या डोक्याला आणि कमरेला मार लागला. स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार अपघाताच्या या घटनेची माहिती मिळूनही वन्य अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहचले.
अपघातानंतर बिबट्या अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर वन्य अधिकारी बिबट्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बिबट्याला पोस्टमोर्टेमसाठी संजय गांधी नॅशनल पार्क येथे पाठवण्यात आले असून हा नर बिबट्या सहा वर्षाचा होता.
हायवेवर वन्य जीवांच्या अपघाताची ही तिसरी- चौथी घटना आहे. या अपघातांच्या घटनांमुळे वन्य प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला जात आहे.