पारोळ : वसई विरार शहर तीन दिवस पाण्याखाली बुडविण्यास येथील महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनीधी जबाबदार असून निवडणुकीत मतांची भीक मागणा-या भिका-यांना चले जाव म्हणण्याचे आवश्यकता आहे, असे प्रतिपादन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीयेथे रविवारी झालेल्या वसई का बुडाली या परिसंवादात केले.ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू हे देखील यावेळी उपस्थित होते. येथील पर्यावरण संवर्धन समिती तर्फे रविवारी संध्याकाळी समाज उन्नती मंडळ हॉल मध्ये आयोजित या परिसंवादास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.जेष्ठ साहित्यिक व हरित वसई चे पुरस्कर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यावेळी म्हणाले की, वसईच्या ज्ञात इतिहासात प्रथमच वसईचा जगाशी संपर्क तुटला, तसेच तब्बल तीन दिवस प्रथमच पूर्व-पश्चिम आणि शहरी-ग्रामीण अशी संपूर्ण वसई पाण्याखाली आली. याची सूक्ष्म कारणमीमांसा होण्यासाठी महापालिकेच्या कारभाराचे कठोर आॅडिट होणे गरजेचे आहे. निसर्गाशी खेळून येथील अनियोजित विकास लादल्या जात आहे. आमचा लढा कुणा व्यक्ती विरुद्ध नाही, तर सामान्यांचे हक्क ओरबाडणाºया प्रवृत्ती विरोधात आहे. पुन्हा वसई बुडू नये, यासाठी शहरास शासनाचे जनतेच्या प्रती प्रतिनिधित्व करणारा आयुक्त आणि लोकांच्या संवेदना जपणारा नगरसेवक हवा आहे. त्याकरता जनसामान्यांनी संघटित होऊन आपल्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. म्हणूनच पुढील काळात आपला प्रतिनिधी जबाबदारीने निवडा. जेव्हा कुणी वाली उरत नाही तेव्हा मवाल्यांचा सुळसुळाट होतो. त्यासाठी आता जागृत होणे गरजेचे आहे.बिल्डर, राजकारणी आणि भ्रष्ट अधिकाºयांच्या अभद्र युतीतून शहरांचे वाटोळे करणारे विकास आराखडे राबवले जात असून, निचºया अभावी दोन-अढीचशे मीमी पाऊसाने तीन दिवस शहर बुडणे ही लाजिरवाणी बाब असल्याचा आरोप करून, चंद्रशेखर प्रभू यावेळी म्हणाले की, ज्यांनी यातना देऊन तुम्हाला रडवले त्यांना रडवण्यासाठी आता गांव आणि शहरातील जनतेने एकत्र येऊन लढा उभारणे आवश्यक आहे.
मतांच्या भिकाऱ्यांना चले जाव म्हणूया - फादर दिब्रिटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:21 AM