हुसेन मेमन जव्हार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले ७ ते ८ महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धत वापरली जात असली तरी विविध कारणास्तव त्याचा ग्रामीण भागात फारसा उपयोग होत नाही. हाच विचार करून ‘तारा आदिवासी सामाजिक संस्था’ यांच्या वतीने संस्थापक प्रदीप कामडी व प्रशांत कामडी हे सहकाऱ्यांसमवेत दररोज दोन तास मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत आणि आदिवासी पाड्यांवरील मुलेही त्याचा आनंद घेत आहेत.
जव्हारसारख्या अतिदुर्गम भागात फेब्रुवारीपासून आश्रमशाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी घरी परतले. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली. परंतु स्मार्टफोन, इंटरनेट नेटवर्क आणि विद्युत पुरवठा या सगळ्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग थोडा यशस्वी झाला. यामुळेच स्थानिक युवकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत पुढाकार घेत विविध उपक्रम सुरू केले. ग्रामीण आदिवासी मुलांच्या अभ्यासात कोणताही खंड पडू नये, लहान मुलांमध्ये शिक्षणाची गोडी टिकून राहावी, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पिंपळशेत कोतीमाळ या आदिवासी पाड्यावर शाळा चालू होईपर्यंत मुलांना रोज दोन तास शिक्षणाचे धडे दिले जातात.
शिक्षण हा मुलांच्या विकासाचा पाया आहे. मुलांना नियमित शिक्षण न मिळाल्यास त्यांची शिक्षणाबाबतची आवड कमी होते. यासाठी मी तारा आदिवासी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मित्रांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. - प्रदीप कामडी, संस्थापक अध्यक्ष, तारा आदिवासी सामाजिक संस्था