पालघर : जागतिक पाणथळ जागा संवर्धन (वेट लँड डे) दिवसानिमित्त शिरगाव येथे रोटरी क्लब पालघर, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठान पालघर जिल्हा यांच्यातर्फे कांदळवन स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण रक्षण तसेच संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले.
पाणथळ जागा एक परिसंस्था आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता पाणथळ जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पाणथळ जागेत भराव घालून जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत असल्याने अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. पक्षांच्या अधिवासाचे क्षेत्रही नष्ट होत चालले आहे.
दरवर्षी परदेशातून स्थलांतर करून जिल्ह्यातील पाणथळ जागा, मिठागरे यांचे क्षेत्र आकुंचित होऊ लागल्याने परदेशी पक्षांची संख्या ही घटत चालली आहे. त्याचप्रमाणे जैवविविधता नष्ट होण्याचा धोकाही वाढला असून पाणथळ जागांची कार्बन शोषून घेण्याची अधिक क्षमता असल्याने वातावरण शुद्ध राहण्यास होणाऱ्या मदतीलाही मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नागरिकांनी पाणथळ जागा जपण्यासाठी, वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आता प्रकर्षाने निर्माण झाली आहे.
सध्या पाणथळ जागा आणि तिवरांची जंगले नष्ट होण्याच्या धोका वाढू लागला असून तिवरांची सरेआम कत्तल केली जात आहे. तर दुसरीकडे अनेक ग्रामपंचायतींची डम्पिंग ग्राउंडही किनारपट्टीवर असल्याने भरतीच्या पाण्याने डम्पिंगमधील कचरा पाण्याद्वारे वाहून तिवरांच्या झाडांमध्ये अडकत आहे. या कचºयाची विल्हेवाट लावणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी त्याची विल्हेवाट लावत लोकांमध्ये जनजागृती केली.
रोटरी क्लबतर्फे आयोजन
या कार्यक्रमात एनएसएसच्या ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अभियानासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. भूषण भोईर आणि अनिकेत शिर्के (वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान पालघर) यांचे विशेष सहकार्य लाभले. या अभियानास रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित पाटील, सचिव प्रशांत पाटील, अभियान प्रमुख संजय महाजन, परेश घरत, किशोर महादळकर, रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.