जव्हार : जव्हार तालुक्यात २ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असुन ऐन निवडणुकीच्या काळात वीज पाच ते सहा तास नसल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
सोमवारी मतदानाच्या दिवशीही काही वेळ वीज नव्हती तर मंगळवारी पहाटे तीनपासून सात वाजेपर्यंत वीज गायाब होती. तर मंगळवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात वीज जात असल्याच्या मुद्द्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले. मुळात सध्या निवडणूक म्हटले की ईव्हीएम मशीनबाबत विविध चर्चा सुरू असतात. यामुळे काल वीज गेल्यानंतर वीज आताच नेमकी कशी गेली, अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू होत्या.
मात्र, महावितरणने लाईनमध्ये बिघाड असल्याने वीज गेल्याचे सांगितले.सूर्यनगर ते गंजड येथील सबस्टेशनच्या १३ किमी. अंतरावर हायटेन्शन वायरवर झाड पडल्याने वीज गेली होती. तसेच सूर्यनगर येथील सबस्टेशन जुने झाल्याने तेथे वारंवार बिघाड होत होते. मी माझी टीम पूर्ण रात्रभर तेथे ठेवली होती. म्हणून वीजपुरवठा लवकर सुरळित झाला.- तळणीकर, उपकार्यकारी अभियंता, जव्हार
आम्ही स्ट्राँग रूम तसेच इतर ठिकाणी जनरेटरची व्यवस्था केली होती. त्यामुळे येथे विजेचा प्रॉब्लेम नव्हता. - संतोष शिंदे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी,