हुसेन मेमन
जव्हार : पालघर लोकसभा मतदार संघाचे खा. राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. जिल्ह्यातील कुपोषण तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने रेल्वेमार्ग संदर्भात निवेदनही यावेळी त्यांनी पंतप्रधानांना दिले. पंतप्रधान मोदींनी सुमारे अर्धा तास वेळ देऊन या समस्यांबाबत जाणून घेतले. यादृष्टीने लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
पालघर जिल्ह्यातील आणि विशेषत: जव्हार - मोखाडा या अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुक्यात १९९२ मध्ये झालेले बालमृत्यू, कुपोषण याबाबतीत तपशीलवार वस्तुस्थिती पंतप्रधानांचे निदर्शनास आणून दिल्याचे गावित यांनी सांगितले. तत्कालीन घटनेमुळे जव्हार मोखाड्याची दखल युनेस्कोने देखील घेतली. तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी याची गंभीर दखल घेत अनेक जिल्हास्तरीय कार्यालये स्थलांतरित केली. खास करून महसूल आणि आरोग्य खाते तसेच अन्य महत्त्वाची कार्यालये जव्हारला आणून प्रशासन आदिवासी विकासभिमुख होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीत फारसा बदल न झाल्याने आजही या भागात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे, हे विदारक सत्य आहे. म्हणून अधिक प्रभावशाली उपाययोजनांची नितांत गरज असल्याचे खा. गावितांनी निवेदनात नमूद केले आहे.
कुपोषणाच्या समस्या शिवाय या भागाचा आमूलाग्र बदल घडविण्यासाठी रेल्वेमार्गाचा व पयार्याने रोजगाराचा मुद्दा देखील यात मांडण्यात आला आहे. डहाणू-जव्हार-मोखाडा-नाशिक या रेल्वेमार्गाची मागणी बऱ्याच वषार्पासून होती. उपग्रहाद्वारे याची पाहणी झाली होती. भव्य बोगदे आणि पूल यावर होणारा मोठा खर्च लक्षात घेता हा रेल्वेमार्ग खर्चिक व अव्यवहार्य असल्याचे सर्वेक्षणाअंती निष्कर्ष काढून हा प्रोजेक्ट बासनात गुंडाळला गेला. या बाबी लक्षात घेता डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाऐवजी भिवंडी-वाडा-जव्हार-मोखाडा-नाशिक अशा नवीन नियोजित रेल्वे मार्गाची योजना असल्यास ती अल्प खर्चात व अधिक व्यावहारिक देखील राहील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.