पालघर : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्ज माफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखेत व प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समित्यांमध्ये खास सुविधा निर्माण केली आहे. आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची मुदत १५ सप्टेंबर असली तरी शेतकºयांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वरील सुविधा केंद्रावर तात्काळ फॉर्म भरावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, सुविधा केंद्रांचे समन्वयक व बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेमधून थकबाकीदार व नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांची संख्या जवळपास तीस हजाराच्या आसपास आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत दहा हजाराच्या वर शेतकºयांनी आपले अर्ज अपलोड केले असून पंधरा हजाराच्यावर नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा कमी असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखेत व प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समित्यांमध्ये १० मशीन्स उपलब्ध केल्या आहेत. काही अडचण आल्यास जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उर्जित बर्वे (९७६९८३६६९९) यांच्याशी शेतकºयांनी संपर्क साधवा.
कर्जमाफी अर्ज त्वरित भरा, जिल्हाधिका-यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:43 AM