- मंगेश कराळेनालासोपारा : कोरोना महामारीमुळे गेल्या मार्चपासून सर्वत्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊनचा मोठा फटका महावितरणला बसला असून वसई तालुक्यात कोट्यवधी रुपयांची वीजबिले थकली आहेत. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत २१ कोटी रुपयांची थकलेली वीजबिले वसूल करण्याचे मोठे आव्हान वसईच्या महावितरणसमोर उभे ठाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊनमुळे वसई विभागाच्या महावितरण कार्यालयाला ४४० व्होल्टेजचा झटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक घरात कैद असल्याने ते विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. कोरोनाच्या संक्रमणामुळे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना वसई विभागात मीटर रीडिंग घेता न आल्याने वीज ग्राहकांना वाढीव बिल पाठविण्यात आले होते. वाढीव बिलामुळे त्रस्त ग्राहकांनी आणि इतर राजकीय पार्ट्यांनी वीज विभागाविरोधात आंदोलनही केले होते. खासदार आणि आमदारांनी वीज ग्राहकांना वीजबिले कमी होतील, अशी आश्वासने दिली होती. तरीसुद्धा वीजबिल नाही भरल्यावर मीटर कापून जाईल, या भीतीने अनेक वीज ग्राहकांनी वाढीव आलेले वीजबिल भरले आहे.
आजही महावितरणची १२१ कोटींची वीजबिले ग्राहकांनी भरलेली नाहीत. याच बिलाच्या पैशांतून महावितरणकडून नवीन ट्रान्सफाॅर्मर, नवीन खांब, केबल, डीपी बॉक्स इत्यादी वस्तू खरेदी केल्या जातात. या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वीजबिल थकल्याने या विभागातील वीजसंबंधी डागडुजी करण्यासाठी त्रास होत आहे. विशेष म्हणजे वसई विभागात २० लाख लोकसंख्या असून ९ लाख ६ हजार ८९१ वीजग्राहक आहेत. ही वसुली करण्याचे माेठे आव्हान महावितरणसमाेर आहे.