नालासोपारा/वसई : लॉकडाऊनमुळे दारू दुकाने तसेच बिअर बार बंद असल्यामुळे महिन्याभरापेक्षा जास्त काळ तळीमारांची मोठी पंचाईत झाली आहे. पण, सरकारकडून दारू विक्रीला परवानगी देण्यात आल्याने दारू दुकानांसह अन्य दुकाने सोमवारपासून सुरू होतील अशी तळीरामांची अपेक्षा होती. यासाठी दारूच्या दुकांनासमोर सकाळपासूनच तळीरामांची लांबलचक रांग दिसली. वसई-विरारमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाही दारूच्या दुकानांबाहेर सकाळी सातपूर्वीच तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मात्र अखेर दारूची दुकाने न उघडल्याने तळीरामांची निराशा होऊन त्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.
पालघर जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असल्याने बरेच निर्बंध आहेत. मात्र सोमवारपासून दारूची दुकाने उघडणार असल्याची बातमी समजल्यानंतर तळीरामांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आणि दुकाने उघडण्यापूर्वीच अनेक तळीरामांनी दारूच्या दुकानांसमोर रांगा लावल्या. यामुळे अनेक ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा संपूर्ण फज्जा उडाल्याचे दिसले. वसई तालुक्यात ३ मेपर्यंत वसई ४४, नालासोपारा ५८, विरार ४४ आणि नायगाव २ व इतर ४ असे एकूण १५२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ‘रेड झोन’ आणि ‘कंटेन्मेंट झोन’ असल्यामुळे दारूची दुकाने उघडतील की नाही, याची खात्री न करता सोशल मीडियावरील बातम्यांवर भरवसा ठेवून सोमवारी सकाळीच दुकानांसमोर सर्वांनी रांगा लावल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी दारूची दुकाने न उघडल्याने त्यांची निराशा झाली.