मनोर : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या कामगारांना त्यांच्यात्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काही विशेष गाड्याही सोडण्यात आलेल्या आहेत, मात्र तरीही काही मजूर पुन्हा गावी जाण्यासाठी रस्त्यावरून पायपीट करताना दिसत आहेत.
पालघर जिल्ह्यातील मनोर परिसरात असे अनेक कामगार पायी निघाले असल्याचे दिसून आले. त्यांना विचारले असता, ‘ट्रेन का तिकीट मिलने के लिये और दो महिना लगेगा’, असे त्यांनी उत्तर दिले. पालघर-बोईसर येथील कंपन्यांमध्ये काम करणारे हे हजारो कामगार आपल्या गावी उत्तर प्रदेश, बिहार, झाडखंड येथे जाण्यासाठी ट्रेनची वाट न बघता हातात पाण्याची बाटली, पाठीवर बॅग घेऊन रस्त्यारस्त्यांवर पायपीट करताना दिसत आहेत.
सरकारने या मजुरांना त्यांच्यात्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. पालघर जिल्ह्यामधूनच आतापर्यंत दोन विशेष गाड्या सोडल्या गेल्या आहेत. एक गाडी वसईवरून उत्तर प्रदेशसाठी तर दुसरी गाडी डहाणू येथून राजस्थानातील जयपूरसाठी सोडण्यात आली. उर्वरित मजुरांना त्यांच्यात्यांच्या गावी सोडण्यासाठीही व्यवस्था केली जात आहे, मात्र आधीच ४० दिवसांपेक्षा जास्त काळ लॉकडाउनमध्ये अडकलेल्या आणि हातावर पोट असलेल्या या मजुरांचा संयम संपत चालला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आपला नंबर येऊन तिकीट मिळण्यासाठी खूपच वेळ लागेल. म्हणून आम्ही पायी निघालो आहोत. कसेही करून आम्हाला घरी पोहोचायचे आहे. जेवण मिळाले नाही तरी चालेल, पण आम्हाला आमच्या मुलाबाळांना भेटायचे आहे. एवढी एकच ओढ आता आम्हाला आहे.कामगारांना गाडी मिळेपर्यंत धीर धरवेनाकेंद्र-राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. परराज्यांतील अनेक मजूर अस्वस्थ झाले असून त्यांना आता लवकरात लवकर गावी जाण्याची ओढ लागली आहे. सरकार जरी प्रयत्न करीत असले तरी आपला नंबर कधी येईल, याची त्यांना शाश्वती नाही. एवढे दिवस हातांना काम नसल्याने हातावर पोट असलेल्या या मजुरांच्या हाती पैसेही नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या घराच्या दिशेने पायपीट करण्यास सुरुवात केली आहे.