नालासोपारा : वसई -विरार शहरातील बेकायदेशीर गावठी दारू बनविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी महिन्याभरात जोरदार मोहीम उघडललेली आहे. मात्र, तरी देखील जंगल, खाडी किनारी आणि निर्जन बेटांवर मोठ्या प्रमाणावर दारूचे अड्डे कार्यरत आहेत. ते शोधण्यासाठी आता पोलिसांनी ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्याचे ठरवले आहे.राज्य शासनाने हातभट्टीच्या दारूनिर्मितीवर बंदी घातली आहे. मात्र वसई विरार हे अशा दारूंच्या निर्मितीचे केंद्र बनत चालले आहे. वसई विरार शहराच्या पश्चिमेला सागरी किनारा आणि पुर्वेला जंगल आहे. घनदाट जंगलाच्या आत आणि खाडीच्या तिवरांच्या जंगलात मोठ्या प्रमाणात हे अड्डे सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे दारू माफियांनी आता बेटावर आणि दाट तिवरांच्या जंगलात आपल्या हातभट्टया लावायला सुरू केल्या आहेत. अनेकदा पोलीस कारवाईला जातात परंतु त्यांना नेमके ठिकाण कळत नाही आणि दारूमाफिया पोलिसांना चकमा देण्यासाठी यशस्वी होतात. यासाठी आता पोलिसांनी ड्रोन कॅमेर्Þयाचा वापर करण्याचे ठरवले आहे. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले की, आमची नियमित कारवाई सुरू असते आणि आम्ही लाखो रु पयांचा मालही जप्त केला आहे. अनेकदा जप्त केलेला माल आंम्हाला सोबत घेऊन आणता येत नाही. अशावेळी तो त्याच ठिकाणी जाळून नष्ट केला जातो. अनेकदा जंगलात आणि बेटावरील अड्डे कारवाईच्या वेळी समजत नाही. त्यामुळे ड्रोनचा फायदा होईल.
वसईतील दारूच्या अड्ड्यांवर ड्रोनमधून नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 3:39 AM