- हितेन नाईक , पालघर
जिल्ह्यातील आठ तालुक्यात २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरून अन्नधान्यासह मोठ्याप्रमाणात वित्तहानीच्या घटना घडल्या होत्या. या सर्वं बाधितांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली असली तरी केंद्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर जिल्ह्यातील २ हजार ६३२ घरे हि ४८ तास पुराच्या पाण्याखाली राहिली नसल्याने या सर्व कुटुंबाना भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना मदतीचे दर व निकष राज्याच्या महसूल व वनविभागाने ठरविले आहेत. त्याप्रमाणे राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या व्यक्तींना मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनांनी संयुक्तकपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना केली आहे. त्यानुसार अपघातग्रस्त व्यक्ती पैकी जखमी व्यक्ती एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी करीत रुग्णालयात दाखल झाल्यास ४ हजार ३०० रुपये तर एक आठवड्या पेक्षा अधिक कालावधी करीता दाखल झाल्यास १२ हजार ७०० रुपये, अवयव अथवा डोळे निकामी होऊन ४० टक्के ते ६० टक्के अपंगत्व आल्यास रु , ५९ हजार १००, ६० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास २ लाख तर मृत व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये, गंभीरपणे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन मदत म्हणून मदत छावणीमध्ये आश्रय न घेतलेल्या प्रति प्रौढ व्यक्तीस ६० रुपये तर प्रति बालकास ४५ रुपये देण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत. मात्र नैसिर्गक आपत्तीमध्ये दोन दिवसा पेक्षा अधिक कालावधी करीता क्षेत्र पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णत: वाहून गेलेली असल्यास, पूर्ण क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे, भांडी,घरगुती वस्तू करीता अर्थसहाय्य म्हणून कपड्या साठी प्रति कुटुंब १ हजार ८०० रु पये तर घरगुती भांड्या करीता प्रति कुटुंब २ हजार रु पये देण्यात येतात.पालघर जिल्ह्यात एकूण २,९६०.३ मिली मीटर पाऊस पडला असून २१ ते २३ सप्टेंबर या तीन दिवसात पालघर, डहाणू, वसई, तलासरी इ, तालुक्यात मुसळधार पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्व रस्ते पाण्याने भरून गेल्याने वाहतूक ठप्प पडली होती. रेल्वेचे रुळ पाण्याखाली जाऊन रेल्वे सेवेवर परिणाम होऊन अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर डहाणू तालुक्यातील झाई येथील मच्छीमारांनी किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या नौका उलटून त्यातील जाळी, डिझेल, व इतर मच्छीमारी साहित्यवाहून गेले होते. तर बहुतांशी सर्व शाळांना सुटी जाहीर करावी लागली होती.असे झाले होते नुकसान : जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील पालघर, सफाळे, तारापूर, बोईसर, मनोर इ. भागातील एकूण १ हजार ६९४ घरामध्ये पाणी शिरले होते. तर ४ घरांची पडझड झाली होती. तसेच दिनेश पाटील यांचा शॉक लागून मृत्यू झाला होता. डहाणू तालुक्यातील चिंचणीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होती ८४८ घरा मध्ये पाणी शिरले होते. तर ५ घरांची मोठी पडझड झाली होती. तर सोनू रामबहादूर यादव (२१) यांचा बुडून मृत्यू झाला होता. तलासरी तालुक्यातील सुमारे ९० घरामध्ये पाणी शिरून ९ घरांचे नुकसान झाले होते. वसई तालुक्यात मात्र कुठल्याही घरांचे नुकसान झाले नसून बाबल्या मडवीसह अन्य एक व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. तर विक्र मगड, जव्हार, मोखाडा, वाडा या चार तालुक्यावर पावसाचा विशेष प्रभाव पडला नाही.पालकमंत्री काय म्हणाले होते? : जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर, डहाणू तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती मध्ये सापडून नुकसान झालेल्या भागांतील कुटुंबाना भेटी देत शासन सर्वोतोपरी साहाय्य करणार असल्याची ग्वाही दिली होती. परंतु जिल्ह्यातील २ हजार ६३२ घरा मध्ये पाणी शिरून हजारो कुटुंबतील महिला आपल्या पोराबाळांना घेऊन पुराच्या पाण्यात उभ्या होत्या. ह्यावेळी त्यांच्या घरातील सर्व अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे, इलेक्तिट्रक वस्तू, पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले होते. मात्र ही सर्व घरे ४८ तास पाण्याखाली राहिली नसल्याच्या निकषाखाली त्यांना मिळणाऱ्या प्रति कुटुंब ३ हजार ८०० रु पयांच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार आहे.आमच्या मच्छीमार नौका उलटून सर्व साहित्य वाहून गेल्याने आमचे २५ ते ३० हजाराचे नुकसान झाले आहे.मात्र नुकसान भरपाईची आशा नाही. - नट्टू सारंग, झाई.आमच्या तारापूर भागातील अनेक घरामधील महिला दिवसभर पाण्यात उभ्या होत्या, त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. अशा वेळी त्यांना शासकीय मदती पासून वंचित राहावे लागत असेल तर आमचे दुर्दैव आहे. - संगीता दवणे, तारापूर.