मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मुंबई पोलिसांसाठी विरार बोळिंज येथे १८६ सदनिकांपैकी १०९ घरांची लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. पालघर पोलीस जिल्हा अधिक्षकांनी म्हाडाला याबाबत पत्र पाठवून विनंती केली आहे. त्यामुळे ही लॉटरी काही दिवसांसाठी पुढे ढकलणत येत असल्याचे कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.उद्या २७ नोव्हेंबरला ही सोडत होणार असल्याचे म्हाडा प्रशासनाने जाहिर केले होते. परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती विचारात घेता, पोलीस अधीक्षकांनी प्रशासकीय कारण देत ही लॉटरी पुढे ढकलण्याची विनंती म्हाडा प्रशासनाला केली आहे. हे पत्र प्राप्त होताच, म्हाडा कोकण मंडळाची लॉटरीबाबतची संपूर्ण तयारी असतानाही, लॉटरी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पोलिसांच्या हिताला प्राधान्य देत केंद्र सरकाने नवीन योजना राबवली आहे. याअंतर्गत २०२२ पर्यंत पोलिसांना खासगी मालकीची घरे देण्याचे म्हाडा प्रशासनाने जाहीर केले. या घरांच्या किंमतीही कमी असणार आहेत. सगळ्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावी ही राज्य सरकारची योजना आहे.पंतप्रधान आवास योजनेखाली प्रत्येक घरासाठी मिळणारे अंदाजे २ लाख ७५ हजार रूपयांचे अनुदान हे पोलिसांच्या घरांसाठी देण्यात येणार आहे.पोलिसांसाठी गृहनिर्माण सोसायट्या उभारणारमुंबईमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल या महापालिकांच्या हद्दीतील जागाही बघण्यात येत आहेत. पोलिसांच्या घरांची मागणीगही सातत्याने जोर धरत होती. गृहविभागाने यासाठी विशेष प्रस्ताव तयार केला होता. त्याअंतर्गत म्हाडाने पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी विरार आणि पनवेलमधे जागा निश्चित केली आहे. त्यानुसार विरार बोळिंज परिसरात म्हाडाच्यावतीने पालघर पोलिसांसाठी गृहनिर्माण सोसायट्या उभारण्यात येणार आहेत.
बोळिंजमधील घरांची लॉटरी पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:34 AM