जव्हार : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या वाढवण बंदराविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ असे बॅनर झळकवत निषेध व्यक्त केला आहे. यामुळे पालघरमधील या आदिवासी आमदारांचा आवाज विधिमंडळामध्ये घुमल्याने वाढवण बंदराचा विरोध आता अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. आमदारांच्या या भूमिकेचे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीनेही स्वागत केले आहे.बंदरासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा स्थापन केलेल्या कंपनीमार्फत विकसित केल्या जातील. त्यात समुद्रात भराव टाकून जमीन तयार करणे, बॅकवॉटरसाठी बांधकाम करणे, बंदरासाठी आवश्यक त्या दळणवळण सुविधा निर्माण करणे या कामांचा समावेश आहे. स्थानिक मच्छीमार वर्ग देशोधडीला लागणार आहे. याविरोधात १५ डिसेंबरला मुंबईच्या कफ परेडपासून डहाणूच्या झाईपर्यंतच्या कोळीवाड्यांनी बंदची हाक दिली असून, या दिवशी किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहेत, असे निकोले म्हणाले. बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा या बंदराला कायम विराेध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.रस्त्यावरची लढाई लढण्यास तयार; आमदारांचा निर्धारस्थानिकांना देशोधडीला लावून जर विकासाचे आणि रोजगारचे गाजर कोणी दाखवणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही, यामुळे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीला नुसताच तोंडी नाही तर त्यांच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढायलाही आम्ही तयार असल्याचे आमदार भुसारा यांनी सांगितले. दरम्यान, आमदार राजेश पाटील यांनीही या बंदराला आमचाही कडाडून विरोध असून येथील लोकांच्या भावना केंद्र सरकारने लक्षात घ्यायला हव्यात. नियमांना बगल देऊन कोणी हा प्रकल्प आमच्या बांधवावर लादणार असेल तर आम्ही येथील लोकांच्या पाठीशी ठाम आहोत, असे सांगितले.
वाढवण बंदराविराेधात घुमला विधान भवनात बुलंद आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 12:02 AM