कासा : डहाणू तालुक्यातील चारोटीजवळील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे महालक्ष्मीदेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथील महालक्ष्मीदेवीचे हे जागृत देवस्थान असून देवी नवसाला पावते, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. पालघर जिल्ह्यातील हे मोठे देवस्थान आहे. नवरात्रोत्सवामध्ये डहाणू तालुक्यातील हे प्रसिद्ध मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान असल्याने महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व गुजरातमधून या ठिकाणी दररोज हजारो भाविक येतात. महालक्ष्मी मंदिराची बांधणी ३०० वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर, १९८५-८७ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या दोन्ही बाजूंना दीपमाळ बांधण्यात आली. एक हजार वर्षांपूर्वी मंदिरावर हल्ला करुन येथील सोनेचांदीने नटलेल्या मंदिराची प्रचंड हानी केल्याची घटना इतिहासात आढळते. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व डहाणू तालुकास्थानापासून सुमारे २५ किमी अंतरावर हे मंदिर आहे. देवीचे मूळ स्थान मात्र मुसळचा या डोंगरावर आहे. त्यास ‘महालक्ष्मी गड’ म्हणून ओळखले जाते. देवीच्या बहुतेक मंदिरांचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असते. परंतु, या मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. देवीच्या प्राचीन मूर्तीच्या बाजूला दोन द्वारपालांची मूर्ती तर एका बाजूला महाकाली, सरस्वती, कालिकादेवीच्या लहान मूर्ती तर दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. (वार्ताहर)
नवसाला पावणारी डहाणूची महालक्ष्मी
By admin | Published: October 17, 2015 1:34 AM