मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार येथे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये अडकून आहेत. जोपर्यंत विनोद तावडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तावडेंना सोडणार नाही असा पवित्रा क्षितिज ठाकूर यांनी घेतला आहे. या प्रकारामुळे हॉटेल परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. याठिकाणी बविआ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
तर विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्यात सत्तेनंतर काय विकास करू, केंद्राच्या माध्यमातून काय केले हे सांगितले. लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफी, लाडका भाऊ योजनेसारखे अनेक कामे प्रभावी ठरली. जनतेच्या मनात आज ठाम आहे महायुती सरकार आपल्याला हवे. तसे चित्र महाराष्ट्रात झाले. त्यामुळे अशाप्रकारे नियोजितपणे प्लॅनिंग करून आधी अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारा, दगड कुणी मारले चौकशीतून समोर येईल. आता वसईला झालेला प्रकार हाच आहे. आपल्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यातून महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत. क्षितिज ठाकूर हे आमचे विरोधक आहेत. ते काही आमच्या बाजूने बोलणार नाहीत. त्यांना आरोप करणे स्वाभाविक आहे. आमचे उमेदवार राजन नाईक त्याठिकाणी जिंकतायेत. त्यामुळे शेवटचा दिवस असताना अख्ख्या बविआची लोक तिथे हॉटेलला घेराव घालून बसलेत. त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे अशाप्रकारे सर्व प्रकार घडवून आणले जात आहेत असा आरोप भाजपाने केला.