Dahanu Assembly Constituency : विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये आज मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राजन नाईक यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआच्या नेत्यांनी केली. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये गोंधळ घातला. या प्रकरणी आता विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा सगळा प्रकार सुरु असताना डहाणूमध्ये बविआला मोठा धक्का बसला आहे. मतदानाला काही तास उरले असतानाच डहाणूत बविआच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. यानंतर बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर हे दाखल झाले होते. हॉटेलमध्ये गोंधळ सुरु असतानाच डहाणूमध्ये हितेंद्र ठाकूर यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूमधील अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश केला.
बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करत सुरेश पाडवी यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता डहाणूमधूल सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. पाडवी यांच्या प्रवेशामुळे डहाणू मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. तसेच बहुजन विकास आघाडीसमोर नवीन चिंता निर्माण झाली आहे.
विनोद तावडेंविरोधात गुन्हा दाखल
निवडणूक आयोगान विनोद तावडे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हा आपल्याविरुद्धचा कट असून निवडणूक आयोगाने याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं आहे.