BJP Vinod Tawde ( Marathi News ) : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे वादात सापडले असून त्यांनी नालासोपारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विनोद तावडे हे ५ कोटी रुपये घेऊन आल्याची टीप मला भाजपमधील मित्रांनी दिली होती, असा आरोप बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. तसंच ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना हॉटेलमध्ये घेरावही घातला. यावेळी हॉटेलमधील एका रुममधून ९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसंच एक डायरीही सापडली. ही डायरी विनोद तावडे यांचीच असून त्यामध्ये १५ कोटी रुपयांचा उल्लेख असल्याचा आरोप बविआचे नेते क्षितीज ठाकूर यांनी केला आहे.
आमच्या उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराला मदत व्हावी, यासाठी विनोद तावडे यांच्या माध्यमातून पैसे वाटण्यात येत होते, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. तर दुसरीकडे, हितेंद्र ठाकूर यांनीही तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "माझी चूक झाली, मला माफ करा, पण इथून जाऊ द्या," असं तावडे यांनी मला फोन करून म्हटल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. मला तावडे यांनी २५ फोन केले, असं ते म्हणाले.
दरम्यान, "मी पैसे वाटल्याचे आरोप खोटे आहेत. मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत ते कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी मी इथे आलो होतो," असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं आहे.
पत्रकार परिषद रद्द
बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहिता असून पीसी घेऊ शकत नाही, असे सांगत पीसी रोखण्यात आली.