Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मंगळवारचा दुपारनंतरचा दिवस नालासोपारा-विरार येथे झालेल्या राड्यामुळे चांगलाच गाजला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर येथे आले. त्यांनीही सुरुवातीला तावडे आणि भाजपावर तोंडसुख घेतले. परंतु, या घडामोडी सुरू असतानाच डहाणू येथील बहुजन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपामध्ये प्रवेश केला. हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला?
दिवसभरातील या घटनाक्रमानंतर सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. मतदानासाठी काही तास उरलेले असताना भाजपाने उमेदवार गळाला लावल्याने हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. यातच पुत्र क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात भाजपाने राजन नाईक यांना उमेदवारी दिली. क्षितिज ठाकूर यांचा नालासोपाऱ्यातील प्रभाव कमी होऊन ही निवडणूक अटीतटीची होणार तसेच राजन नाईक 'टफ फाइट' देतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. त्यासाठीच विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे गंभीर आरोप करून वातावरण आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न बविआकडून करण्यात आला की काय, अशी चर्चा सोशल मीडियात रंगल्याचे दिसते.
खरेच भाजपातील कोणी टीप दिली की, हितेंद्र ठाकूर यांनी डाव पलटवला
भाजपामधील माझ्या काही हितचिंतकांनी, मित्रांनी विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटण्यासाठी येणार असल्याची टीप दिली होती, असा मोठा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. माध्यमांनी हरतऱ्हेने याबाबत हितेंद्र ठाकूर यांना नेत्यांची नावे घेण्यास सांगितले. परंतु, अखेरपर्यंत हितेंद्र ठाकूर यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. यावरून खरेच कोणा भाजपा नेत्याकडून टीप मिळाली होती की, हितेंद्र ठाकूर भाजपाचाच डाव भाजपावरच उलटवण्यासाठी असे दावे करत होते, असाही सूर दिवसभरातील राड्यानंतर उमटला आहे.
दरम्यान, मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना बविआचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजप उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बविआला मोठा धक्का बसला असून, भाजपाचे पारडे जड झाले आहे. मतांमध्ये फूट होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे पाडवी यांनी म्हटले आहे. या भागाचा विकास मागील पाच वर्षांपासून खुंटला आहे. त्यामुळे मी भाजपा उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहे. मते खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या उमेदवाराला निवडून दिले तर मागील पाच वर्षांपासून खुटंलेला विकास होईल, अशी आशा आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिल्याचे पाडवी यांनी स्पष्ट केले आहे.