- आशिष राणे
वसई : महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
या ध्वजारोहण समारंभाला पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जि.पं.चे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे ,पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. दरम्यान, या समारंभासाठी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित ,पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन आदी महसूल, जिल्हा परिषद व पोलीस दलातील निवडक अधिकारी देखील उपस्थित होते.
या प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे यांना पालघर पोलीस दलाने मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी महसूल विभागासहित सर्व प्रशासकीय विभागाचे कर्मचारी अधिकारी वर्गास महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री भुसे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजना बाबतीत पुन्हा एकदा चर्चा केली.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने यंदाही दुसऱ्या वर्षी घेतला आहे. शासनाचे हे सर्व निर्देश पाळत येथील पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.