पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अमित घोडा यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उद्या, शुक्रवारी ते उमेदवारी अर्ज भरतील. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, वेगवेगळ्या मतदारसंघांतील भाजपमधील बंडखोरांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र विक्रमगड मतदारसंघात भाजपसोबत शिवसेनेतही खदखद कायम आहे.पालघर विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळच्या मतदानावरून दिसले होते. पालघर विधानसभेतून मिळालेल्या ६० हजारांच्या मताधिक्यामुळे आणि आपल्या विरोधात सक्षम उमेदवार पुढे येत नसल्याने सेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा हेच मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा दावा आ. फाटक यांनी बुधवारी झालेल्या सेनेच्या बैठकीत केला होता. श्रीनिवास वनगा यांना शब्द दिल्याने विद्यमान आमदार घोडा यांना ठाकरे यांनी बाजूला केले. त्याचवेळी आ. घोडा यांना नंतर सन्मानाचे पद मिळेल असा शब्द उद्धव ठाकरेंनी त्यांना बुधवारी मातोश्रीवर दिल्याचे सांगत ते बंडखोरी करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. परंतु आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत अमित यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे श्रीनिवास वनगा यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे.घोडा हे राष्ट्रवादीतर्फे उभे राहिले, तर काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप आणि इतर मित्र पक्षांकडून मदत मिळणार असल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यातच काही काळासाठी आपल्या पक्षापासून दूर राहिलेले आनंद ठाकूर हेही आता राष्ट्रवादीत सक्रीय होणार असल्याने घोडा यांची ताकद वाढणार आहे.अमित यांंच्या बाजूने नेहमीच उभा ठाकणारा मोठा वर्ग त्याच्या संपर्कात असल्याने शिवसेनेतील नाराजीचा फायदा उचलण्याचा जोरदार प्रयत्न ते करतील, असे सांगितले जाते. काँग्रेसच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ राजकारणाच्या बदलत्या समीकरणात राष्ट्रवादीकडेआला आणि मतदारसंघात माहित असलेला चेहरा त्या पक्षाला मिळाला. डहाणू तालुक्यातील कासा, चारोटी आदी भागातील आदिवासींवर त्यांची भिस्त आहे. किनारपट्टीवरील अनेक गावात सेनेचे प्राबल्य असले, तरी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनानंतरही डिझेलवरील अनुदान, हद्दीचा वाद, कर्ज माफ करण्यासह कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यातच वाढवण बंदराबाबत शिवसेनेची स्पष्ट भूमिका होत नसल्याने त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होईल. तसे झाल्यास या मतदारसंघातील लढत रंगतदार होईल.मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे शिवसेनेतबोईसर : महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या स्थापनेपासून त्या पक्षासोबत असलेले पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी बुधवारी रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक व शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.संखे पूर्वी भारतीय विद्यार्थी सेनेत तालुकाप्रमुख होते. नंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. मध्यंतरी काही कारणास्तव त्यांनी जिल्हाध्यक्षपद सोडले. परंतु दीड वर्षानंतर पुन्हा त्यांना ती जबाबदारी देण्यात आली. पक्षवाढीसाठी पुरेसे पाठबळ मिळाला पाहिजे ते मिळत नसल्याने मी शिवसेनेत दाखल झालो, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
Maharashtra Election 2019 : पालघरमध्ये सेनेत बंडखोरी, अमित घोडा राष्ट्रवादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:46 AM