कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही प्रचाराचा पाहिजे तेवढा प्रचाराचा जोर दिसत नाही. त्यातच या भागात अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता आहे.
डहाणू तालुक्याचा कासा, वाणगाव, गंजाड हा भाग पालघर मतदारसंघात येतो. तर सायवन, धुंदलवाडी, मोडगाव आदी ग्रामीण भाग डहाणू मतदारसंघात येतो. ग्रामीण आणि आदिवासी भागात विविध प्रकारच्या समस्या आजही भेडसावत आहेत. हा भाग आदिवासी असून येथे कोणत्याही विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच महामार्गवर सतत होणारे अपघात त्यामुळे या भागात सुसज्ज दवाखान्याची गरजे आहे. यासाठी अनेक वर्षांपासून नागरिक मागणी करीत आहेत. जवळपास कासा येथे एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र तिथे डॉक्टर, कर्मचारी यांची कमतरता तसेच कोणत्याही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कठीण परिस्थितीत रुग्णांना १०० किमी अंतरावर मुंबई - ठाणे, ५० ते ६० किमी वापी, सेलवासाकडे जावे लागते. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रु ग्णांनी आपला जीव गमावला आहे.
या भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शैक्षणिक विकास झालेला नाही. इंजिनिअरिंग, वैद्यकीय, कायदा, कृषी आदी कोणतीही कॉलेज नाहीत. त्यामुळे पुढीलशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते. सात आठ महिन्यांपासून या भागात वारंवार भूकंप होतात. त्याची तीव्रता ३ ते ४ रिश्टर स्केल असली तरी धुंदलवाडी भागात काही घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक दडपणाखाली जीवन जगत आहेत. शासकीय स्तरावर कोणत्याही विशेष उपयोजना केलेल्या नाहीत.
प्रचारादरम्यान उमेदवारांकडून ठोस आश्वासन नाही
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या प्रचारादरम्यान कोणत्याही पक्षाचे उमेदवार येथील समस्या सोडवण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन देत नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये निरुत्साह आहे. या भागात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी वर्ग भात कापणी कामाला लागला आहे. तर काही मजुरवर्ग भात कापणीसाठी दरवर्षी वाडा, पालघर वसई, भिवंडी आदी भागात जातो. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रचारसभा व मतदानासाठी बाहेर काढणे मोठे आव्हान आहे.