पारोळ : वसई तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून आता थेट प्रचारापेक्षा सोशल मीडियाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवार सोशल मीडियावर जास्त भर देऊ लागल्याने प्रचाराचे हे नवे माध्यम प्रभावी ठरताना दिसते आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप यावर आता प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे.वसई तालुक्यात वसई, नालासोपारा, बोईसर या विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र येत असल्याने शहरी भागाबरोबर ग्रामीण भागही या तीनही मतदार संघांशी जोडला गेला आहे. प्रचारासाठी आता अवघे काही दिवस उमेदवारांच्या हातात असल्याने प्रत्येक मतदाराला भेटणे शक्य नाही. मात्र, आता बहुतेक मतदारांकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येते. यासाठी उमेदवारांनी वॉर रूम सुरू केले आहे. या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून आपल्या पारड्यात मते पाडून घेण्याचा प्रयत्न उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातूून वाढत चाललेले प्रचाराचे प्रमाण लक्षात घेता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळेच धार्मिक भावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करणारी माहिती प्रसारित केली, तर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.जुने चित्र बदलतेय : निवडणूक म्हटले की, ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून केले जाणारे आवाहन, उमेदवारांची पायपीट आणि छोट्या-मोठ्या सभांतून उडणारा प्रचाराचा धुरळा, हेच चित्र समोर येते. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसते आहे. सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता आता बहुतेक निवडणूक प्रचारासाठीही या माध्यमाचा चांगलाच वापर केला जात आहे.
Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावर प्रचाराला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 5:26 AM