नालासोपारा : नालासोपारा विधानसभा मतदार संघात प्रचार अंतिम टप्यात आला आहे. रस्ते, वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, पाणी, जुन्या इमारतींचा प्रश्न या प्रमुख मुद्यांवरून सध्या या मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याकडे नालासोपारा आणि विरारकरांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १४ उमेदवार या मतदारसंघात असून सेनेचे प्रदीप शर्मा आणि बविआचे क्षीतिज ठाकूर यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. यामुळेच संपूर्ण जिल्ह्यात ही प्रतिष्ठेची आणि मुख्य लढत असल्याची चर्चा आहे.
विद्यमान आ. क्षितीज ठाकूर हे या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बविआचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात चांगलाच जोर पकडला आहे. प्रदीप शर्मा यांनी आचारसंहिता लागल्यापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. महायुती असल्याने त्यांना भाजप, आरपीआय आणि अन्य सहयोगी पक्षांचा पाठिंबा मिळतो आहे. दरम्यान, ही भाजपला हवी असल्याने, सुरुवातीला थोडी बंडखोरी झाली. पण आता सर्व आलबेल असल्याचे दाखवले जात आहे. मध्यंतरी आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे भाजपाने प्रचार न करण्याची योजना आखली आहे. आता त्यांची मते सेनेला मिळतात की बविआला हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
काही दिवसांपासून या दोन्ही उमेदवारांनी प्रचार रॅली, चौक सभा, बाईक रॅली आदींवर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. आता आॅक्टोबर हीट वाढत असल्याने सकाळच्या प्रचाराऐवजी सायंकाळच्या प्रचारावर अधिकचा भर दिला जात आहे. रॅलीला सुरु वात झाल्यानंतर उमेदवारांचे कुठे औक्षण होतांना दिसत आहे, तर कुठे समस्यांचा पाढा वाचला जात आहे. नालासोपारा, विरार पूर्वेकडील भागात जुन्या इमारतींचा प्रश्न, काही भागात पाण्याची समस्या, कुठे वाहतूक कोंडी तर कुठे रस्त्यांची झालेली दुरवस्था अशा विविध मुद्यांवरून मतदार राजाही या दोन्ही उमेदवारांना आठवण करून देतांना दिसत आहे. तर शहरात विकासकामे झाली असून अजून कामांच्या योजना आखून ठेवल्या असून त्या लवकरच पूर्णत्वास येतील, असे आश्वासन क्षीतिज ठाकूर यांच्याकडून दिले जात आहे.
शहरातील जुन्या इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच मेट्रो, वाहतूक कोंडी, टँकर मुक्त, स्वच्छ पाणी असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रदीप शर्मा यांच्याकडून दिले जात आहे. त्यामुळे खºया अर्थाने निवडणुकीचा रंग चढल्याचे दिसत आहे. एकूणच सकाळी १० ते दुपारी १ आणि सांयकाळी ५ ते रात्री १० असा प्रचार सुरू असून १० नंतर मात्र छुप्या बैठकांवर भर दिला जात आहे. दोन्ही उमेदवारांकडून सकाळीच प्रचाराला सुरुवात केली जात असून मुख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी केल्या जात आहे तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदी किंवा मराठी फिल्म जगताशी निगडित कलाकारांना प्रचार रॅलीमध्ये बोलवण्यात येत आहे.
नालासोपारा उत्तर भारतीय यांचा गड मानला जात असून याला मिनी उत्तरप्रदेश म्हणूनही संबोधले जाते. उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात राहत असून मतदार फक्त २७ टक्के असल्याने त्यांचे मतदान महत्त्वाचे मानले जाते. पण अगदी शांत, कुठेही प्रचारात नसलेले व व्यवसाय करणारे गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे २० टक्के मतदान असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार तोच उमेदवार निवडून येणार असे एकूण चित्र नालासोपारा मतदारसंघात दिसून येत आहे. मतदारसंघात २०१४ मध्ये झालेले मतदान पाहिले तर बविआ एक नंबरवर होती. क्षीतिज ठाकूर यांना १ लाख ११ हजार मते मिळवून ५३ हजार मतांनी निवडून आले होते. या लोकसभा निवडणुकीनंतर नालासोपाºयात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी मतदारांमध्येही वाढ झालेली असून आता या मतदार संघात २ लाख ८६ हजार ४ पुरु ष, २ लाख ३३ हजार २० स्त्रिया आणि ५८ अन्य असे एकूण ५ लाख १९ हजार ८२ मतदार आहेत.
निवडणूक झाली प्रतिष्ठेची
बविआची पूर्ण भिस्त त्यांच्या १०९ लोकप्रतिनिधींवर असून मुख्य नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संपूर्ण मतदारसंघात घरोघरी जाऊन कामांची माहिती देऊन प्रचार करत आहे, त्यांनी कोणत्याही सिनेस्टार अथवा मित्र पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना प्रचारासाठी आणले नसून बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि क्षीतिज ठाकूर यांनी सारी जवाबदारी स्वत:वर घेऊन जागोजागी जाऊन चौकसभा, कॉर्नर मिटिंग, रॅली करत आहे तर सेनेने यूपीचे उपमुख्यमंत्री, खासदार, अॅक्टर रविकिशन, निरु हुआ, विवेक ओबेरॉय, तारक मेहताची टीम यांना प्रचारात उतरून प्रचार रॅली काढली आहे.